नवी दिल्ली: देशात शनिवारी जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला शुभारंभ झाला. काल एका दिवसात देशभरातील एक लाख 91 हजार 181 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. पहिल्या दिवशी करण्यात आलेल्या लसीकरणामध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम समोर आले नाहीत.
विरोधी पक्षांनी अशा प्रकारचे आरोप करताच त्याला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आरोग्य राज्य मंत्री अश्विनी चौबे यांच्यासोबत अनेकांनी कोरोनाची लस सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, “कोरोनाविरोधात सर्वात यशस्वी लढाई भारताने लढली आहे. मला दु:ख आहे की काही लोक यामध्ये राजकारण करत आहेत. माझी या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून संपूर्ण देशाला या लसीच्या सुरक्षिततेबद्दल विश्वास दिला पाहिजे. संपूर्ण देशाला लसीकरणाच्या या अभियानात जोडलं पाहिजे.
देशातील लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना ही लस देण्यात येणार आहे. त्यामध्ये कोरोना योध्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलंय. त्याचवेळी यावरुन राजकारणाला सुरुवात झाल्याचं समोर येतंय. लसीकरणाच्या या कार्यक्रमावर काँग्रेसने काही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर समाजवादी पक्षानेही काँग्रेसचा सूर ओढत केंद्र सरकारवर टीका केली. काँग्रेस नेता मनिष तिवारी यांनी या लसीकरणाच्या कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित करताना सरकारला विचारले की, “ही लस सुरक्षित आहे तर सरकारच्या मंत्र्यांनी का घेतली नाही?