दक्षिण सोलापूर मतदार संघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच भगवा फडकेल अशी घोषणा दोन महिन्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावेळी काँग्रेस तसेच तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून हा मतदारसंघ खेचून घेण्यास उबाठाला यश मिळाले असून माजी आमदार रतिकांत पाटील यांचे चिरंजीव अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून इच्छुक असलेले दिलीप माने यांची मोठी गोची झाली आहे. माने यांच्या भूमिकेकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात सध्या भाजपकडून सुभाष देशमुख, मनसेकडून महादेव कोगनुरे, अपक्ष सोमनाथ वैद्य, आणि आता अमर पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे त्यामुळे दिलीप माने यांनी वेगळी भूमिका घेतली तर या मतदारसंघात चौरंगी किंवा पंचरंगी लढत होईल हे नक्की