येस न्युज मराठी नेटवर्क : भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादीत सर्व रडे आहेत. तपास यंत्रणांनी कारवाई करताच रडू लागतात, अशी टीका करतानाच हिंमत असेल तर राजीनामे देऊन कारवाईला सामोरे जा. मग काय होते ते पाहा, असं आव्हानच निलेश राणे यांनी राष्ट्रवादीला दिलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर धाडी पडत आहेत. त्यामुळे नक्कीच यामध्ये काही गडबड असणार. गडबडीसाठी अजित पवार प्रसिद्ध आहे. विधायक कामांसाठी त्यांचं नाव कुठेच प्रसिद्ध नाही. ज्या कंपन्यावर रेड पडली त्यांनी काही तरी गडबड केली आहे. अजित पवार यांनी किती लोकांची कुटुंबे उद्ध्वस्त केली, किती लोकांना कामाला लावलं हे ते विसरले. त्यामुळे सगळेच भोगावं लागतंय. हे इथेच भोगावं लागणार आणि हे लांबपर्यंत जाणार. अजित पवार साहेब असू शकत नाही. राष्ट्रवादीत सगळे रडे भरलेले आहेत. यांच्यावर आरोप झाले की रडतात. कारवाईला सामोरं जावं आणि राजीनामा द्यावा. मग तुमचं काय होते पाहा, असं आव्हानच त्यांनी अजित पवार यांना दिलं.
शाहरुख खान तुम्हाला पैसे देतोय का?
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावरही टीका केली. नवाब मलिक आपल्या मतदारसंघात काय करतात ते आम्हाला तोंड उघडायला लावू नका. तुमची अंडीपिल्ली आम्हाला माहिती आहेत. तुमचा जावई ड्रग केसमध्ये अडकला होता. आज तुम्ही वांद्र्यात कुणाला पण विचारा, नवाब मलिक यांचा जावई ड्रग विकतो हे तुम्हाला ऐकायला मिळेल, असा दावा करतानाच शाहरुख खान तुम्हाला हे बोलण्यासाठी पैसे देतोय का? तुम्ही एका ड्रग अॅडिक्टची साथ देत आहात हे लक्षात ठेवा, असंही ते म्हणाले.