येस न्युज मराठी नेटवर्क : पालघर जिल्ह्यातील सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी बांधण्यात आलेल्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरण क्षेत्रात मागील काही तासांत तब्बल ५३ मिमी पावसाची नोंद झाली असून त्यामुळं धामणी धरण १०० टक्के भरलं आहे. धरणाचे सर्व दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून त्यातून तब्बल १९.२०५ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे.
धामणी धरणाची आजची पाण्याची पातळी ११८.६५ मीटर आहे तर, धरणातील सध्याचा पाण्याचा साठा २७६.३५ दशलक्ष घन मीटर आहे. या धरणाच्या क्षेत्रात सोमवारी ५३ मिमी पावसाची नोंद झाली असून धरण १०० टक्के भरले आहे. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली असल्याने धरणाचा दरवाजा क्रमांक २ आणि ४ उघडण्याची गरज निर्माण झाली. त्यानुसार सोमवारी सकाळी ९ वाजता प्रत्येकी ३५ सेमीने पाण्याचा विसर्ग वाढवण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले.
मात्र, अतिवृष्टी सुरूच राहिल्याने सकाळी ११ वाजता उघडण्यात येणारे सर्व पाचही दरवाजे १० वाजताच ४१ सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून १५ हजार २०० क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू झाला होता. त्यानंतरही पाऊस सुरूच राहिल्याने दुपारी अडीच वाजता या धरणाचे सर्व दरवाजे १०० टक्के पूर्ण उघडण्यात आले आहेत. तर प्रकल्पाच्या सांडव्यातून वीज निर्मिती करण्यात येणाऱ्या ठिकाणच्या विसर्गातून ६४९ क्यूसेक वेगाने पाणी बाहेर पडत आहे.