मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडून शपथविधीला हजर राहिलेल्या सर्व नेत्यांना पक्षातून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक पत्रक काढून हा आदेश जारी केला आहे. रविवारी, 2 जुलै रोजी अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकार मध्ये सामील होणाऱ्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलेल्यांना पक्षातून बडतर्फ करीत असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रक काढून माहिती दिली आहे.
शपथविधीला उपस्थित राहून हे कृत्य पक्षशिस्त तसेच पक्षाची ध्येय धोरणे यांच्या विरोधात आहे. त्यामुळे ही कृती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाशी संगत नाही आणि त्यामुळे ही बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात येत आहे असं राष्ट्रवादीच्या पत्रकात म्हटलं आहे. बडतर्फ केलेल्यांना यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव चिन्ह वापरता येणार नाही अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना या पत्रात करण्यात आले आहेत.