येस न्युज नेटवर्क : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून, सध्याच्या आकडेवारीनुसार काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. तसेच, भाजपा मोठ्या फरकाने पिछाडीवर दिसतेय. आकडेवारीनुसार काँग्रेसची वाटचाल विजयाच्या दिशेने सुरू असल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे.
कर्नाटकात घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेस कंबर कसत आहे. सध्या मतमोजीणी सुरु असून, घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेसने सर्व आमदारांना बंगळुरूला बोलावंल आहे. यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? असा सवाल पक्षासह देशभरात उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी संकटमोचक ठरलेले डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या चुरस पाहायला मिळत आहे. सिद्धरामय्या हे माजी मुख्यमंत्री आहेत. तसेच, शिवकुमार यांनी निकालपूर्वी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी, मुख्यमंत्रीपदासंदर्भातही भाष्य केले. पक्ष जो निर्णय घेईल तो त्यांना मान्य असेल, असे शिवकुमार यांनी म्हटले होते. तसेच, निवडणुकीत काँग्रेस 140 हून अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करेल, असा दावा देखील त्यांनी केला होता.
विधानसभेच्या संपूर्ण 224 जागांसाठी मतदान पार पडले. एक्झिट पोलनुसार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला धक्का बसण्याची चिन्ह आहेत. निवडणुकीत काँग्रेस 106 ते 120 जागा जिंकेल, असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवला गेला आहे. कर्नाटक सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 113 इतका आहे. तसंच मतांच्या टक्केवारीतही काँग्रेस भाजपला मागे टाकेल, असा अंदाज आहे.