*प्रत्येक शासकीय विभागाने शासनाच्या विविध सेवांची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी विहित वेळेत करावी
सोलापूर – महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 नुसार लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना सुलभ, तत्पर आणि कालबद्ध सेवा उपलब्ध करून देणे हा आयोगाचा मुख्य उद्देश आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून आपल्या विभागांतर्गत च्या सर्व सेवा ऑनलाइन पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच या सर्व सेवा आयोगाने निर्देशित केलेल्या विहित वेळेत उपलब्ध झाल्या पाहिजेत, असेही निर्देश पुणे विभाग राज्य हक्क आयोगाचे राज्य आयुक्त डॉ. दिलीप शिंदे यांनी दिले.
नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा आढावा बैठकीत महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे प्रमुख, महसूल चे उपविभागीय अधिकारी तहसीलदार आदी उपस्थित होते.
राज्य आयुक्त शिंदे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य लोक सेवा हक्क आयोगाला दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांना विहित कालावधीत नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतलेला होता त्या अनुषंगाने सर्व शासकीय विभागाने त्यांच्या अधिनस्त सर्व सेवा व योजनांची माहिती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले
शासनाच्या सर्व विभागांची सेवा आपले सेवा सरकार पोर्टलवर जोडण्याचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल त्यामुळे शासनाच्या सर्व सेवा आपले सेवा सरकार पोर्टलवरच उपलब्ध होतील. सद्यस्थितीत राज्य शासनाच्या 969 सेवा पैकी 536 सेवा ऑनलाइन उपलब्ध झालेल्या आहेत तर उर्वरित सेवा ऑफलाइन पद्धतीने दिल्या जात आहेत. ऑफलाइन सेवा ही लवकरच ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत. तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त विभागांनी त्यांच्या नागरिकांसाठी असलेल्या सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात तसेच ऑनलाइन सेवा उपलब्ध केलेली असेल तर ऑफलाइन अर्ज स्वीकारू नयेत असेही राज्य आयुक्त शिंदे यांनी निर्देशित केले
विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयाचे नियमित तपासणी केली पाहिजे यामध्ये ऑनलाईन पद्धतीने सेवा दिल्या जात असल्याची खात्री करावी तसेच ऑनलाइन आलेल्या तक्रारीवर प्रथम अपिलीय अधिकारी तसेच द्वितीय अपील अधिकारी वेळेत प्रक्रिया करून त्याची नागरिकांना विहित कालावधीत उत्तरे देत असल्याची खात्री करणे आवश्यक असल्याचे राज्य आयुक्त शिंदे यांनी सांगितले. तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या विविध सेवांची माहिती तसेच त्या सेवा किती कालावधीत दिल्या पाहिजेत त्याचे सविस्तर माहिती असलेले डिजिटल बोर्ड लावणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सूचित केले.
राज्य लोकसेवा हक्क आयोग अंतर्गत देण्यात येत असलेल्या सेवा बाबत सोलापूर जिल्ह्याचे काम चांगले असल्याचे राज्य आयुक्त शिंदे यांनी सांगून आणखी एक चांगले काम करण्याचे आवाहन केले. तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी या अंतर्गत आलेल्या ऑनलाईन अर्जावर त्वरित कार्यवाही करून सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत प्रभावीपणे सेवा उपलब्ध करून देणे बाबत दक्षता घ्यावी असेही त्यांनी सुचित केले. त्याप्रमाणेच 28 एप्रिल 2025 रोजी लोकसेवा हक्क आयोगाच्या दशक पुर्ती निमित्त जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर विविध जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हास्तरीय यंत्रणे कडून राज्य लोकसेवा हक्क आयोगानुसार देण्यात येत असलेल्या सेवांची माहिती दिली. तर महापालिकेच्यावतीने देण्यात येत असलेल्या एकूण 67 सेवांची माहिती आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी देऊन यातील 38 सेवा सध्या ऑनलाईन देण्यात येत असून पुढील आठवड्यात आणखी नऊ सेवा ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर जिल्हा परिषद अंतर्गत देण्यात येत असलेल्या सेवांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी महसूल प्रशासनाच्या वतीने लोकसेवा हक्क आयोगाच्या कामकाजाची माहिती दिली. उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी प्रस्ताविकात राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या कामकाजाची माहिती देऊन उद्देश सांगितला. तर तहसीलदार शिल्पा ओसवाल यांनी सूत्रसंचालन केले.


जिल्हा परिषदेच्या कामकाजाची तपासणी –
राज्याचे सेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे यांनी आज सोलापूर जिल्हा परिषद येथे भेट देऊन सोलापूर जिल्हा परिषदेमार्फत सेवा हमी कायदा अंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवाबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद सोलापूर मार्फत सेवा निर्गती व सेवा प्रचार प्रसिद्धी बाबत सेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे यांनी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा बैठकीमध्ये आढावा घेतला.
सोलापूर जिल्हा परिषद मार्फत प्रत्येक तालुक्यात स्थापन करण्यात आलेले प्रत्येकी एक आदर्श आपले सरकार सेवा केंद्रातून नागरिकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिले बाबत माहिती घेण्यात आली.येत्या १ मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये सेवा हक्क अधिनियमाचे वाचन करून अधिनियमांस प्रसिद्धी देणेबाबत सूचनाही सेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे यांनी केली.सदर बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) स्मिता पाटील,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) इशाधीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव,आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक महावीर काळे आदी उपस्थित होते.तसेच यावेळी राज्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी सोलापूर उत्तर तालुका पंचायत समितीची पाहणी व तपासणी केली.