अल्पसंख्याक हक्क दिन 18 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा होणार, सर्व संबंधित यंत्रणांनी उपस्थित राहावे
सोलापूर, दिनांक 12 (जिमाका):- प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रमा अंतर्गत अल्पसंख्याकांसाठी असलेल्या विविध योजनांची संबंधित विभागांनी प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना विहित वेळेत लाभ मिळवून दिला पाहिजे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कांबळे मार्गदर्शन करत होते.
यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखरडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. बी. काटकर, कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त हनुमंत नलावडे, शासकीय पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. उपाध्य यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी/ प्रतिनिधी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी कांबळे पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रमा अंतर्गत अल्पसंख्याक युवकाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नती व त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांच्या विभागामार्फत असलेल्या योजनांची माहिती पात्र अल्पसंख्याक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवून त्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या अडीअडचणी समजून त्यांच्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा अल्पसंख्याकांसाठी लाभ देण्याबाबत प्रत्येक विभागांनी निश्चित आराखडा तयार करावा व दरवर्षी किमान एक प्रकल्प कार्यान्वित होईल याबाबत योग्य कार्यवाही करावी. संबंधित विभागांनी त्यांना मंजूर असलेल्या निधीमधील 15% निधी अल्पसंख्याकांच्या योजना साठी राखून ठेवावा. व अल्पसंख्याकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून एक ही पात्र लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी कांबळे यांनी दिले.
यावेळी शालेय शिक्षण, क्रीडा, समाज कल्याण उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग कौशल्य विकास, नगर विकास, सामाजिक न्याय विभाग यांनी जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजासाठी राबवलेल्या योजनांचा सविस्तर आढावा घेऊन श्री. कांबळे यांनी मार्गदर्शन सूचना दिल्या. यामध्ये शिक्षण विभागाने अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांची गळती रोखून शिष्यवृत्ती प्रकरणे मंजुरीसाठी करावेत.
अल्पसंख्याकांच्या वस्तीमध्ये चांगले रस्ते, वीज व पाणी आदी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करून त्यांना रोजगार उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावेत. पोलीस विभागाने जातीय सलोखा राखण्यासाठी सभा बैठका घेऊन मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही श्री. कांबळे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा होणार
दिनांक 18 डिसेंबर हा अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून प्रतिवर्षी साजरा केला जातो त्याप्रमाणे याही वर्षी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी हा दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी अल्पसंख्यांकासाठी विविध योजना राबवणाऱ्या प्रत्येक विभागाने आपल्या विभागाची सविस्तर माहिती घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी श्री कांबळे यांनी केले.