सोलापूर :- कोविड 19 चा नवीन ओमीक्रोन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य शासनाने दिनांक 27 नोव्हेंबर 2021 रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्याची जिल्हास्तरावर काटेकोरपणे अंमलबजावणी प्रत्येक विभागाने करावी. तसेच प्रत्येक विभागाच्या अधिनस्त असलेले कार्यालय व संस्था मधील प्रत्येकाचे लसीकरण करून सोलापूर जिल्ह्याच्या लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले.
कोविड-19 विषाणूचा संसर्ग व प्रार्दुभाव रोखणेकामी उपाययोजना बाबत आयोजित आढावा बैठकीत श्रीमती पवार बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, जिल्हा उपनिबंधक श्री. भोळे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक, तहसीलदार डॉक्टर दत्तात्रय मोहोळे, डॉ. सय्यद, डॉ. लोहारे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नाशिककर व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती पवार पुढे म्हणाल्या की, सोलापूर जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले पाहिजे. पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण शंभर टक्के व्हावे यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत तसेच लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्याही किमान 80 टक्के झालं पाहिजे, यासाठी सर्वांनी नागरिकांचे प्रबोधन करावे व प्रशासनाने सुरू केलेल्या लसीकरण मोहीमेस नागरिकांनी ही लस घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ओमीक्रोन हा नवीन विषाणू आल्यापासून जिल्ह्यात लसीकरणाच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच आजचे लसीकरण 50 हजारापर्यंत गेल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांनी देऊन पुढील आठ दिवस रोज किमान 60 हजार नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी दिल्या.
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी कोविड पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. यामध्ये तोंडाला योग्य पद्धतीने मास्क लावणे, सॅनिटाझर चा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे व हात स्वच्छ धुणे या बाबींचा समावेश आहे असे श्रीमती पवार यांनी सांगून जिल्ह्यातील नागरिकांनी ही लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले. लसीकरण न झालेल्या नागरिकांना शासन निर्देशा नुसार मुक्तसंचार लागून असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही तेथील सर्व व्यापारी, मापाडी कामगार व तिथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करण्याबाबत बाजार समिती प्रशासनाने दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने बाजार समितीच्या मागणीनुसार त्या ठिकाणी लसीकरण करण्याबाबत कॅम्प लावावा अशाही सूचना श्रीमती पवार यांनी दिल्या. यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाची माहिती देण्यात आली तर उपस्थित विभागाने त्यांच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती बैठकीत सादर केली.