पुणे : बारामती तालुक्यातील अजित पवारांच्या काटेवाडी ग्रामपंचायतीत अजित पवार गटाला घवघवीत यश प्राप्त झालं आहे. काटेवाडीत 16 पैकी 14 जागांवर अजित पवार गटाने बाजी मारली आहे. तर भाजपनं पहिल्यांदाच काटेवाडीत शिरकाव केला आहे. भाजपने काटेवाडीत 2 जागा जिंकल्या आहे.
काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंरची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गट पुन्हा बाजी मारणार की मतदार भाजपला संधी देणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली होती. अखेर बहुप्रतिक्षित काटेवाडी ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले. पवारांटं वर्चस्व असलेल्या काटेवाडीत यंदा भाजपचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळालं. काटेवाडीत पहिल्यांदाच भाजपनं दोन जागा जिंकल्या आहेत.
बारामातीतील काटेवाडीत अजित पवार विरुद्ध भाजप अशी लढाई होती. सत्तासंघर्षानंतर अजित पवारांच्या काटेवाडीत अजित पवारांचं वर्चस्व कायम राहतं का ?, याकडे सर्वाचं लक्ष होतं. मतदानावेळी अजित पवार गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले होते. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा लढा असल्याचं बोललं गेलं होतं. मात्र अजित पवारांनी काटेवाडीत आपला दबदबा कायम ठेवत 14 जागेवर विजय खेचून आणला आहे.