मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला कात्रजचा घाट दाखवला आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नाराज असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यामुळे नाराज अजित पवार पुन्हा एकदा कोणता मोठा निर्णय घेणार का? इथपर्यंत ही चर्चा जाऊन पोहोचली होती. मात्र, आता या नाराजीचा सर्व उलगडा आज एका क्षणामध्ये झाला आहे. राज्यातील सुधारित पालकमंत्री जाहीर करण्यात आले असून अजित पवार गटातील तब्बल सात मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. यामध्ये अजित पवारांनी दुसऱ्यांदा शिंदे गटाचा ‘गेम’ केल्याचं बोललं जात आहे.
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदे गटाकडून सातत्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली, अशी स्थिती मुख्यमंत्री शिंदे गटाची राहिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज चर्चा असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने दिल्लीला गेले होते. या भेटीमध्येच पालकमंत्रीपदाचा निकाल लागला आहे. त्यामुळे आता एकंदरीतच एकंदरीत पालकमंत्रीपदाचा तिढा काहीसा सुटला असला, तरी शिंदे गटाची नाराजी पुन्हा एकदा वाढत जाण्याची शक्यता आहे. अजित पवार महाविकास आघाडीमध्ये असतानाही शिंदे गटांतील नेत्यांकडून त्यांच्यावर आरोप केले होते. आता सत्तेत सहभागी झाल्यानंतर सुद्धा अजित पवार यांचाच वरचष्मा राहत असल्याने शिंदे गटाची अवस्था बिकट होत चालली आहे.