येस न्युज मराठी नेटवर्क : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. या निमित्तानं राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे.
‘महाराष्ट्राच्या महान नेतृत्वास माझी विनम्र आदरांजली. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान व सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला. महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया,’ असं अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
त्याशिवाय, महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, राज्यमंत्री अमित देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे.
बाळासाहेब हे तमाम शिवसैनिकांचे दैवत. आपल्या दैवताला आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर शिवसैनिक गर्दी करतात. आज देखील सकाळपासूनच शिवसैनिकांची रीघ लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या रूपानं राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाल्यानं शिवसैनिकांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: तसं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे सकाळी साडेअकरा वाजता शिवाजी पार्कवर बाळासाहेबांना अभिवादन करणार आहेत.