येस न्युज नेटवर्क । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पटेल यांच्या जाण्यानं काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.
अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विट करून माहिती दिली. “जड अंतःकरणाने माझे वडील अहमद पटेल यांचं निधन झाल्याची घोषणा करावी लागत आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ३.३० वाजता आपल्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. जवळपास एका महिन्यापूर्वी त्यांना करोना झाल्याचं निदान झालं होतं. उपचारादरम्यान त्यांच्या शरीराच्या अनेक अवयवांनी काम करणं बंद केलं होतं. एकाच वेळी अनेक अवयव निकामी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर गुरूग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. मी सगळ्यांना आवाहन करतो की, गर्दी ठिकाणी जाणं टाळून करोना नियमांचं पालन करा. नेहमी सोशल डिस्टन्सिगचं पालन करा,” असं फैजल पटेल यांनी म्हटलं आहे. अहमद पटेल यांनी १ ऑक्टोबरला स्वतः ट्विट करून करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.