सोलापूर-कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी तालुका माळशिरस येथील मे. हरी ओम कृषी सेवा केंद्र, पाटील वस्ती, बागेचीवाडी (माळशिरस-अकलूज रोड) येथे विनापरवाना खत उत्पादन व विक्री प्रकरणी महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. ही कारवाई जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
भरारी पथकाचे अध्यक्ष हरिदास हावळे (कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर) व सदस्य बाळू बागल, शरद गावडे, लक्ष्मण लामकाने आणि शरद सावंत यांच्या उपस्थितीत तपासणी दरम्यान मे. न्यूट्रीस्टार क्रॉप सायन्सेस, मांजरी बुद्रुक, पुणे या कंपनीचे विनापरवाना सूक्ष्म अन्नद्रव्य खते आढळून आली.
- आढळलेली उत्पादने:
- Ferostar – Chelated Ferrus as Fe EDTA 12%
- Zincstar – Chelated Zinc as Zn EDTA 12%
- Calstar – Chelated Calcium as Ca EDTA 10%
एकूण ₹93,258 किमतीचा साठा आढळून आला असून, सदर उत्पादनांबाबत कोणतेही बिल, परवाना, साठा नोंद, विक्री अभिलेख उपलब्ध नव्हते. उत्पादनाच्या पॅकिंगवर अस्तित्वात नसलेले पत्ते नमूद करण्यात आले होते. याशिवाय लॅब तपासणीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीही अनुपस्थित होती.
- कायदेशीर तरतुदींचा भंग:
सदर प्रकरण खते नियंत्रण आदेश १९८५ व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गंभीर स्वरूपाचे असून, संबंधित खत उत्पादक व विक्रेत्यांनी खंड ४, ५, ८, १९, २१ तसेच कलम ३(२)व व ७(२-A) चे उल्लंघन केले आहे.
तहसील कृषी अधिकारी कार्यालय, माळशिरस येथील कृषी अधिकारी (गुनि) श्री. शरद आण्णा सावंत यांनी अकलूज पोलीस ठाण्यात FIR क्र. ०६२० दिनांक १०.०९.२०२५ रोजी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास अकलूज पोलीस करत आहेत.
- पुढील कार्यवाही:
- संबंधित खत साठ्यावर विक्री बंद आदेश लागू
- साठा इतरत्र हलवू नये, अशा सूचना
- इतर तालुक्यांमध्येही अशा उत्पादनांचा साठा असण्याची शक्यता
कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेली ही कारवाई शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि खत विक्रीतील पारदर्शकतेसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.