सोलापूर : मुरारजी पेठ येथील संभाजीराव शिंदे शिक्षण संकुलात हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै. सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस अर्थात १ जुलै कृषी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी बाबासाहेब सिरसट, मसले चौधरी तालुका मोहोळ, दत्तात्रय तोरमकर, नागनाथ विजापुरे अंकलगी, शिवतेज विजापुरे, परशुराम कोळी यांची उपस्थिती लाभली. प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता व संस्थेचे संस्थापक स्वर्गीय विष्णुपंत तथा तात्यासाहेब कोठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर शाळेच्या वतीने सर्व प्रमुख शेतकरी बांधवांचा फेटा, शाल व रोप देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शेतकरी श्री. बाबासाहेब सिरसट व श्री नागनाथ विजापुरे यांनी विद्यार्थ्यांना शेतीविषयक माहिती देताना निसर्गाचा लहरीपणा व शेती मालाचे अनियमित भाव यामुळे शेतकऱ्यांना कसे नुकसान सोसावे लागते हे सांगितले. शेतीतील विविध उत्पादने व शेतीच्या आधुनिक व पारंपारिक पद्धती याविषयी देखील माहिती देण्यात आली.
याप्रसंगी इयत्ता सहावी मधील विद्यार्थिनी कु. ज्ञानेश्वरी शिंदे हिने आपल्या भाषणातून शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते, ज्ञानेश्वरी शिंदे हिचा दिव्यांग विद्यार्थ्यांना समान संधी या उपक्रमा अंतर्गत वक्तृत्व व गीत गायन स्पर्धेत पारितोषिक मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक नागेश कुमार काटकर, गोपीचंद राठोड, मल्लिनाथ टाकळे, आशा गायकवाड, अंजली उंबरगीकर यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्लिनाथ टाकळे, उदय घाटे, मनीषा वाघमारे, विद्या हंचाटे, भारती गायकवाड यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संयोजन प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. बिभीषण सिरसट सर यांनी केले तर तर आभार प्रदर्शन मल्लिनाथ टाकळे यांनी केले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते शाळेच्या मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले.