मिंस्क : बेलारूसचे नोबेल शांतता पुरस्कार विजेते आणि मानवाधिकार कार्यकर्ते अॅलेस बिलियात्स्की यांना स्थानिक न्यायालयानं 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्याशिवाय आणखी दोन जणांना सरकारविरोधातील निदर्शनांना फंडिंग केल्याप्रकरणी शिक्षा झाली आहे.
बेलारूसच्या न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला सुरू होता. यामध्ये अॅलेस बिलियात्स्की यांच्यासह तिघांवर सरकार विरोधी आंदोलनाला आर्थिक रसद पुरवल्याचा आरोप होता. यात तिघेही दोषी आढळल्यानतंर न्यायालयाने 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 2020 मध्ये झालेल्या निदर्शनांनंतर सरकारने चौघांना अटक केली होती. बेलारुसचे अध्यक्ष म्हणून अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या निवडीविरोधात ते निषेध करत होते. लुकाशेन्को 1994 पासून राष्ट्राध्यक्ष आहेत. बेकायदेशीर मार्गाने विरोधी पक्ष कमकुवत करून ते पुन्हा पुन्हा सत्तेत येतात, असे आरोप त्यांच्यावर होत आहेत. अॅलेस यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की, बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांचं सरकार त्यांना जबरदस्तीनं गप्प करण्याचा प्रयत्न करत आहे.
लुकाशेन्को यांना सत्तेतून बाहेर काढल्याबद्दल अॅलेस यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांना नोबेल शांतता पारितोषिक प्रदान करण्यात आलं होतं. त्यावेळी नोबेल समितीने म्हटले होतं की, बेलारूस सरकारने त्यांचा निषेध दडपण्याचा वर्षानुवर्षे प्रयत्न केला, त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले, त्यांची नोकरीही हिसकावून घेण्यात आली होती.
दरम्यान, आता 60 वर्षीय अॅलेस बिलियात्स्की यांना सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणं, आंदोलकांना निधी देणं यासाठी ही 10 वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अॅलेस यांच्याविरुद्ध ही कारवाई राजकीय सुडातून केल्याचा आरोप अधिकार गटानं केला आहे. त्याच वेळी, निर्वासित बेलारशियन विरोधी पक्षनेत्या स्वेतलाना सिखानौस्काया यांनी अॅलेस यांचं समर्थन केलं. अॅलेस यांना झालेली शिक्षा लज्जास्पद असल्याचे त्यांनी सांगितलं. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.