येस न्यूज नेटवर्क : जवळपास दोन वर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात जात नसल्याच्या मुद्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासस्थानातून राज्य कारभाराची सूत्रे हलवली होती. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री मंत्रालयात येत असे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात दाखल होताच विविध विभागाचा दौरा केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना महासाथीची लाट सुरू असताना निवासस्थानावर होते. कोरोना काळात राज्याचे महत्त्वाचे निर्णय मंत्रालयातून होत नसल्याबद्दल विरोधकांनी टीका केली होती. तर, सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली होती. मुख्यमंत्री ऑनलाइन पद्धतीने सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला होता.