नवी दिल्ली: अडीच महिन्याच्या काळानंतर पुन्हा एकदा LAC वरचा तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीन या दोन देशांदरम्यान रविवारी चर्चा होणार आहे. ही चर्चा चीनच्या हद्दीतील माल्डो या भागात होणार असून भारताकडून लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन याचे नेतृत्व करणार आहेत. लडाखच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या दोन देशांदरम्यान ही नववी बैठक आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून भारत आणि चीन दरम्यान लडाखच्या सीमेवर तणाव सुरु आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात भारतीय हद्दीतील लडाखच्या सीमेत चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केली होती. त्यावर दोन्ही देशात संर्घष पेटला आहे. हा वाद चर्चेच्या माध्यमातून मिटावा अशी भारताने भूमिका घेतली आहे. आतापर्यंत या दोन देशात आठ बैठका झाल्या आहेत तरी कोणताही ठाम निष्कर्ष निघाला नाही. या दोन देशांमध्ये 6 नोव्हेंबर रोजी शेवटची बैठक झाली होती.
भारतीय लष्करातर्फे लेहमधील 14 व्या कोअर (फायर अॅन्ड फ्यूरी) चे कमांडर, लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन या चर्चेसाठी नेतृत्व करतील तर चीनकडून पीएलए सेनेचे दक्षिण डिस्ट्रिक्ट कमांडर नेतृत्व करणार आहेत. ही चर्चा चीनच्या हद्दीतील मोल्डो बीपीएम हट या ठिकाणी होणार आहे. दोन्ही देशांनी आपापले सैनिक LAC च्या मागे घ्यावेत आणि या परिसरातील सैनिकांची संख्या कमी करावी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी असतील असं सांगण्यात येतंय.