येस न्युज नेटवर्क : उत्तराखंडमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने जोरदार विजय मिळवला आहे. मंगळूरमध्ये निकराच्या लढतीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. याशिवाय बद्रीनाथमध्येही काँग्रेस पक्षाने ताकद दाखवली. उत्तराखंडच्या दोन विधानसभेच्या जागांसाठी 10 जुलै रोजी पोटनिवडणूक झाली होती, ज्याचे निकाल आज आले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अयोध्येनंतर झालेल्य पराभवानंतर आता बद्रीनाथमध्येही भाजपला दारुण पराभवास सामोर जावं लागलं आहे.
दोन्ही जागा जिंकल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण
चमोली बद्रीनाथ विधानसभा पोटनिवडणुकीच्या 15व्या टप्प्यातील मतमोजणीनंतर काँग्रेसचा लखपत बुटोला 5224 मतांनी विजयी झाले. बुटोला हे काँग्रेसचे नवे उमेदवार होते, तर बद्रीनाथचे माजी आमदार भंडारी हे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते, त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. लखपत बुटोला यांना 28161 तर भाजपचे राजेंद्र भंडारी यांना 22937 मते मिळाली. मंगळूर विधानसभेतील काँग्रेसचे उमेदवार काझी निजामुद्दीन हे भाजपच्या करतार सिंह भडाना विरुद्ध 449 मतांनी विजयी झाले. त्यामुळे दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. विधानसभा पोटनिवडणुकीत दोन्ही जागा जिंकल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. ढोल-ताशांच्या तालावर पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना मिठाई खाऊन विजयाचा आनंद साजरा करत आहेत.
मुख्यमंत्री, पाच खासदारांनी प्रचार करूनही दारूण पराभव
उत्तराखंड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि खुद्द मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दोन्ही जागांवर पक्षाच्या विजयाचा दावा केला होता. येथील निवडणूक प्रचाराची जबाबदारी त्यांनी स्वत: घेतली. याशिवाय लोकसभेच्या पाचही जागांवर नवनिर्वाचित खासदारांनीही प्रचार केला. त्यानंतरही भाजपला येथे पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी स्वत: दोन्ही जागांवर काँग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी जनतेत प्रचार केला होता. त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि उत्तराखंडमधील दोन्ही जागांवर काँग्रेसने भाजपचा पराभव केला.