अतिरिक्त झालेल्या शिक्षकेत्तर ४४ कर्मचाऱ्यांचे झाले समायोजन
सोलापूर : सन २०२३-२४ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकेत्तर ४४ कर्मचाऱ्यांचे समायोजनाला अखेर मुहूर्त लागला. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी समायोजन तर केले आता आदेश आणि संबधित शाळा हजर करून घ्यावे हीच अपेक्षा जिल्ह्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील अतिरिक्त झालेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन शहरातील हरिभाई देवकरण प्रशालेत ठेवण्यात आले होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी समायोजनाची प्रक्रिया पार पाडली. या समायोजन प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातील अतिरिक्त झालेले अल्पसंख्याक वरिष्ठ लिपीक ८, बिगर अल्पसंख्याक वरिष्ठ लिपीक १५, अल्पसंख्याक कनिष्ठ लिपीक १, बिगर अल्पसंख्याक मुख्य लिपीक ३, अल्पसंख्याक प्रयोगशाळा सहाय्यक ३, बिगर अल्पसंख्याक प्रयोगशाळा सहाय्यक १४ असे एकूण जवळपास ४४ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात आले.
त्यासाठी कोणत्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोणती शाळा हवी आहे त्याचा विकल्प ठेवण्यात आला होता. त्यामध्ये ज्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ज्या शाळेत समायोजन व्हायचे आहे तसा विकल्प शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिला. विशेष म्हणजे दोन वेळा पुढे समायोजनाची तारीख पुढे ढकल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता होती. परंतु माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचा सोमवारी आणि मंगळवारी पुणे, मुंबई दौऱ्यानंतर बुधवारी ही समायोजनाची प्रक्रिया केली. परंतु अनेक शाळा या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना समायोजन करूनही हजर करून घेत नाहीत अशा शाळेवर शिक्षणाधिकारी यांनी तंबी देण्याची मागणी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून केली जात आहे.