सोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या पुढाकाराने पद्मशाली शिक्षण संस्था संचलित , सौ भू म पुल्ली कन्या प्रशालेत महिला दिनाचे औचित्य साधून शुभारंभ करण्यात आलेल्या सायकल बँक योजनेत नवीन सहा सायकलींची भर पडली.
देणगीदार डॉ कौशिक शहा ( पुणे ), प्रशांत कोंडले ( बेंगलोर ) , सुनील मदन , अमोल सारडा , श्रीमती सरोज गुलाटी आणि प्रसिद्ध उद्योजक रोटे. गोवर्धन चाटला यांच्या दातृत्वातून सहा नवीन सायकली प्रदान करण्यात आल्या.
पूर्व भागातील बहुतांशी यंत्रमाग व विडी कामगारांच्या मुली सौ भू म पुल्ली कन्या प्रशालेत शिक्षणासाठी प्रवेश घेतात. अत्यंत बिकट परिस्थितीतून काबाड कष्ट करत या मुली शिकण्याची जिद्द मनात बाळगून लांबच्या परिसरातून चालत शाळेत येतात. शाळेपासून जवळपास 10 ते 13 किमी अंतरावरून पायी चालत येणाऱ्या मुलींना सायकल बँक योजनेअंतर्गत सायकल देऊन त्यांच्या येण्या जाण्याची सोय केल्यास मुलींच्या शिक्षणातील अडचणी दूर होतील आणि शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल या हेतूने या योजनेचा शुभारंभ करण्यात आला . समाजातील दानशूर व्यक्ती ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. असे प्रतिपादन मुख्याध्यापिका गीता सादुल यांनी प्रस्ताविकातून केले.
रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष सुहास लाहोटी , सेक्रेटरी विशाल वर्मा , युथ सर्व्हिस डायरेक्टर गोवर्धन चाटला, कौशिक शहा , खजिनदार सुरज तापडिया , अँन मसाई चाटला तसेच संस्थेचे विश्वस्त विजयकुमार गुल्लापल्ली आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि पुल्ली कन्या प्रशालेचे एक अनोखे नाते निर्माण झाले असून समाजातील गोरगरीब मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी कडून नेहमी सहकार्य मिळेल अशी ग्वाही अध्यक्ष सुहास लाहोटी यांनी दिली.
कोरोना महामारीच्या संकटकाळात देखील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शाळेच्या वतीने अनेक ऑनलाइन उपक्रम आयोजित केले गेले याबद्दल गोवर्धन चाटला यांनी कौतुक केले. उपमुख्याध्यापक युवराज मेटे यांनी आभार मानले. पर्यवेक्षिका प्रणिता सामल व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.