नवी दिल्ली : भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे फ्रान्सचे बर्नार्ड अर्नॉल्ट आणि जेफ बेझोस यांना मागे टाकत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी समूहाच्या अध्यक्षांच्या संपत्तीत शुक्रवारी ५ अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून त्यानंतर त्यांची संपत्ती आता सुमारे १५५.७ अब्ज डॉलर्स एवढी आहे. अदानी आता फक्त टेस्लाचे मुख्य कार्यकारी एलोन मस्क यांच्या मागे आहे ज्यांची एकूण संपत्ती अंदाजे २७३.५ अब्ज डॉलर आहे.
फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट १५५.२ अब्ज डॉलर संपत्तीसह तिसरे आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस १४९.७7 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय टेस्लाचे सीईओ एलोन मस्क २७३.५ अब्ज डॉलर्ससह पहिल्या क्रमांकावर आहेत. भारतीय शेअर बाजारात गुरुवारी घसरण झाली. मात्र या घसरणीनंतरही अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली.अदानी समूहाच्या सातही सूचीबद्ध कंपन्यांचे समभाग वधारले. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस ४.९७ टक्क्यांनी सर्वाधिक वाढली.