सोलापूर, दि.5- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्र अंतर्गत सुरू असलेल्या ॲक्युप्रेशर अभ्यासक्रमाचे राज्यातील 75 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले. या सर्व यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन कार्यक्रमात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
ॲक्युप्रेशर ही एक प्राचीन निसर्गोपचार पद्धत असून गंभीर आजारदेखील ॲक्युप्रेशरच्या उपचार पद्धतीने बरे होतात. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात गेल्या दोन वर्षापासून कौशल्य विकास केंद्र अंतर्गत ॲक्युप्रेशर अभ्यासक्रम चालू आहे. तंत्रशुद्ध पद्धतीने तज्ञांकडून यामध्ये प्रशिक्षित करण्यात येते. ॲक्युप्रेशरच्या या अभ्यासक्रमास सोलापूरकरांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.
75 विद्यार्थ्यांनी ॲक्युप्रेशरच्या या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. सर्व विद्यार्थी यशस्वीरित्या यात उत्तीर्ण झाले आहेत. प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून ॲक्युप्रेशरच्या माध्यमातून रोजगार मिळविण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर, कुर्डूवाडी आणि नागपूर येथील केंद्रांवर ही परीक्षा झाली आहे. ॲक्युप्रेशर तज्ञ पराग कुलकर्णी, भाविक जोशी यांनी विद्यार्थ्यांना धडे दिले आहेत. विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप यांनी यासाठी साहाय्य केले आहे.
कौशल्य विकासाचे असे कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रेडीट मिळू शकतात आणि त्याचा उपयोग ते आपल्या भविष्यकाळात रोजगारासाठी उपयोगाला आणू शकतात. यासंदर्भात नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात उल्लेख आहे.