येस न्युज नेटवर्क : गेल्या काही दिवसांपासून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात येत असतानाच, अब्दुल सत्तार यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत असल्याचा गंभीर आरोप सत्तार यांनी केला आहे. अब्दुल सत्तार यांच्या या विधानाने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. त्यामुळे शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी सुरु असल्याची चर्चा आता रंगताना पाहायला मिळत आहे.
टीईटी घोटाळा, सिल्लोड येथील कृषीमहोत्सव आणि वाशीम येथील गायरान जमिनीवरून अब्दुल सत्तार यांच्यावर मोठ्याप्रमाणावर आरोप होत आहे. दरम्यान यावर पहिल्यांदाच अब्दुल सत्तार यांनी मौन सोडले आहेत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यात काही माझ्या पक्षातील असू शकतात तर काही माझे हितचिंतक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कोणेतरी बाहेर बातम्या पुरवत असल्याचा आरोप सत्तार यांनी केला आहे. तर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरु असल्याचं सत्तार म्हणाले.