येस न्युज मराठी नेटवर्क : दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने कमाल केली आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला बहुमत मिळालं आहे. यासोबतच दिल्ली महापालिकेवरील भाजपची दीड दशकाची सत्ता संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत मुख्य लढत आप, भाजप आणि काँग्रेसमध्येच होती. भाजपने कडवी लढत दिली आहे. तर काँग्रेसला दुहेरी आकडा गाठण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागत आहे.
दिल्ली महापालिकेच्या 250 जागांसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. तर आज (7 डिसेंबर) मतमोजणी पार पडत आहे. या निवडणुकीत 250 जागांसाठी एकूण 1349 उमेदवार मैदानात होते. दिल्ली महापालिकेवर गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता होती. मात्र यंदा आम आदमी पक्षाला दिल्ली महापालिकेची सत्ता काबीज करण्यात यश आलं आहे.
आम आदमी पक्षाला बहुमत
दरम्यान, दिल्ली महापालिकेच्या 250 पैकी 233 जागांचे निकाल (दुपारी 2 वाजेपर्यंत) हाती आले आहेत. यात आम आदमी पक्षाला 126 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजप 97 जागांवर विजयी झाली आहे. काँग्रेसने 7 जागांवर विजय संपादन केला आहे. तर 3 अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. अजूनही 17 जागांचे निकाल येणं बाकी आहे.