एमआयडीसी परिसरातील वीज वितरणाची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करणार
सोलापूर दि.20 – अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे दिनांक 18 मे 2025 रोजी पहाटे एका टॉवेल कारखान्याला आग लागून त्यात आठ नागरिकांचा मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना होती. तसेच यापूर्वीही एमआयडीसीमध्ये आगीच्या घटना झालेल्या असून अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी एक उपसमिती गठित करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.


अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे झालेल्या टॉवेल कारखान्याच्या आग दुर्घटनेबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज महापालिका प्रशासन, विद्युत वितरण कंपनी, अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध विभाग व यंत्रमाग संघ यांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी शिवाजी राठोड, अतिरिक्त महापालिका आयुक्त रवी पवार तसेच संदीप कारंजे, अधीक्षक अभियंता महावितरण सुनील माने, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, तहसीलदार निलेश पाटील व सोलापूर यंत्रमाग संघाचे पदाधिकारी तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे जीवित व वित्तीय हानी होत आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागाच्या विभाग प्रमुख तसेच सोलापूर यंत्रमाग संघाचे प्रतिनिधी यांची सर्व समावेशक अशी एक उपसमिती एमआयडीसी ने गठीत करावी. एमआयडीसीच्या सुरक्षेच्या दृष्टीने या समितीने सर्वसमावेशक विचार करून एक कृती आराखडा तयार करावा व पुढील महिन्यात प्रशासनाला सादर करावा, असेही त्यांनी सूचित केले.
अग्निशामन दलाच्या बंबांना पाणी भरण्यासाठी एमआयडीसी परिसरातच वॉटर फिडर पॉईंट निर्माण करण्याबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचित केले. यावेळी त्यांनी आग लागलेल्या कारखान्याच्या प्रथमदर्शी कर्मचारी यांच्याकडून आगीचे कारण समजून घेतले. तसेच आग विझवण्यासाठी आलेल्या अडचणींची ही माहिती त्यांनी घेतली. त्यावेळी त्यांनी एमआयडीसीचे अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी, महसूलचे अधिकारी व पोलीस प्रशासन यांच्याकडून आगीची कारणे तसेच ती विजवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती घेतली. तसेच एमआयडीसीमध्ये वीज वितरण कंपनीची डीपी फिडर, लाईन याविषयी वीज वितरण कंपनीच्या वीज निरीक्षक यांनी सविस्तर माहिती घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
एमआयडीसी परिसरातील वीज वितरण कंपनीची वितरण व्यवस्था याबाबत त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करून घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.