कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेत खाजगी रुग्णालयाचा ही सक्रिय सहभाग असावा; जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे
सोलापूर, दि. 5(जिमाका):- जिल्ह्यातील एकूण कुष्ठरोग रुग्णांमधील दिव्यांगत्व असलेल्या रुग्णांना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम आयोजित करून जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिकेचे आरोग्य अधिकारी यांनी त्यांच्याकडे असलेल्या अशा वर्कर्स यांच्यामार्फत प्रत्येक गाव व वॉर्ड निहाय कुष्ठरोग रुग्णांची नोंद घेऊन त्यांची नावे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे पाठवावेत. व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून संबंधित कुष्ठरोग रुग्णांना त्वरित दिव्यांगात्वाचे प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत जिल्हा धोरणात्मक कृती आराखडा आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, कुष्ठरोग आरोग्यसेवाचे सहाय्यक संचालक डॉ. मोहन शेगर, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर पिंपळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांच्यासह अन्य समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्ह्यातील कुष्ठरोग रुग्णांना वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच त्यांचा औषध उपचार वेळेत होईल यासाठी आरोग्य यंत्रणे योग्य ती दक्षता घ्यावी. यंत्रणा नियमितपणे रुग्णांच्या संपर्कात राहील असे नियोजन करावे असे सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या. सोलापूर जिल्हा सन 2027 पूर्वी कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी शासकीय यंत्रणा बरोबरच सामाजिक बांधिलकी असणाऱ्या सर्व यंत्रणा यांनी मदत करावी. खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी कुष्ठरोग निदान केलेल्या व उपचारावर ठेवलेल्या सर्व रुग्णांची माहिती आरोग्य विभागास नियमितपणे द्यावी. तसेच त्यांनी कुष्ठरोग मुक्त अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सुचित केले.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या अंलबजावणीचे धोरणे, वर्ष निहाय उद्दिष्टे, सार्वजनिक आरोग्य बाबत दृष्टिकोन आणि एकूण तांत्रिक मार्गदर्शन याबाबत आरोग्य विभाग सोलापूर यांनी जिल्हा धोरणात्मक कृती आराखडा तयार केलेला आहे. मागील दहा वर्षातील अहवालानुसार सोलापूर जिल्ह्याचा कुष्ठरोग रुग्ण संख्या सातत्याने एक पेक्षा कमी होत आहे. सन 2027 पूर्वी सोलापूर जिल्ह्यात सर्व स्तरावर शून्य कुष्ठरोग रुग्ण संसर्ग राहील, अशी माहिती सहाय्यक संचालक डॉ. मोहन शेगर यांनी दिली.
कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यक्रमासाठी आरोग्य यंत्रणेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असून शून्य कुष्ठरोग संसर्ग उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दक्षिण सोलापूर, करमाळा, माळशिरस या तालुक्यासाठी सन 2024-25 हे वर्ष तर बार्शी, मंगळवेढा, सांगोला तालुक्यासाठी सन 2025-26 हे वर्ष त्याप्रमाणेच अक्कलकोट, माढा, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर व सोलापूर महापालिका साठी सन 2026-27 हे वर्ष निश्चित करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील एकूण 1144 गावांपैकी कुष्ठरोगाची संख्या शून्य असलेली 715 गावे आहेत. तर किमान एक कुष्ठरोग रुग्ण संख्या असलेली 250 गावे आहेत. तर दोन ते तीन कुष्ठरोग रुग्ण संख्या असलेली 127 गावे आहेत. तर चार ते पाच रुग्ण संख्या असलेली सत्तावीस गावे असून पाच पेक्षा अधिक कुष्ठरोग रुग्ण संख्या असलेली 25 गावे आहेत अशी माहिती डॉ. शेगुर यांनी दिली.
सन 2022 मध्ये जिल्ह्यातील एकूण 36 लाख 65 हजार 819 नागरिकांची तपासणी केली असता 13 हजार 83 नागरिक कुष्ठरोग असण्याबाबत संशयित आढळले आहेत. यापैकी 111 रुग्णांना नव्याने कुष्ठरोगाची लागण झाल्याचे आढळून आले, असे डॉक्टर शेगर यांनी सांगितले.
प्रारंभी सहाय्यक संचालक आरोग्य सेवक कुष्ठरोग सोलापूर यांच्यावतीने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या जिल्हा धोरणात्मक कृती आराखडा पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आले.
मिशन इंद्रधनुष्य –
विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम अंतर्गत पहिली फेरी 7 ते 12 ऑगस्ट 2023, दुसरी फेरी 11 ते 16 सप्टेंबर 2023 या कालावधीत जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आलेली असून तिसरी फेरी दिनांक 9 ते 14 ऑक्टोबर 2023 या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली.
या अंतर्गत नियमित लसीकरण सत्राचे आयोजन निश्चित केलेल्या दिवशी सुरू आहे. अतिरिक्त सत्राचे नियोजन हे नियमित लसीकरण सत्राचा दिवस वगळून इतर दिवशी अति जोखमीच्या भागात करण्यात येत आहे. झिरो ते दोन वर्ष वयोगटातील लसीकरणापासून वंचित किंवा गळती झालेले लाभार्थी, दोन ते पाच वयोगटातील ज्या बालकांचे गोवर रूबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला आहे. तसेच डीपीटी व ओरल लसीचा डोस राहिलेले लाभार्थी, गर्भवती महिला यांना लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या लसीद्वारे लसीकरण करणे, दिनांक 6 ऑगस्ट 2018 किंवा त्यानंतर जन्मलेला बालकाचा या मोहिमेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे, असे डॉ. पिंपळे यांनी सांगितले.