गोड पदार्थ खाल्ले कि, आपल मन आणि पोट दोन्ही तृप्त होण्याची १००% शाश्वती आहेच. मात्र, बाहेर मिळणारे मोतीचुराचे लाडू, काजूकतली, असंख्य प्रकारचे पेढे आणि बर्फ्या देखील खवय्यांना तितक्याच जवळच्या असतात. ह्यापैकीच आणखी एक मिठाई म्हणजे काजू पिस्ता रोल. तुमच्यापैकी अनेकांना ही मिठाई प्रचंड आवडत असेल.
काजू पिस्ता रोल हे ड्राय फ्रूट्सने भरलेले असतात. त्यामुळे, ऊर्जा देण्यासोबतच ते अत्यंत चविष्ट देखील लागतात. खरंतर काजू आणि पिस्ता यांपासून तयार केलेली मिठाई बाजारात सहज उपलब्ध असते. परंतु, सध्याच्या दिवसांमध्ये अनेक लोक शक्यतो बाहेरचे पदार्थ खाणं टाळतात. पण, यंदा तुम्ही या सण-उत्सवाच्या काळात तुमची आवडती मिठाई घरच्या घरीच बनवू शकता. याचसाठी आज आम्ही तुम्हाला काजू पिस्ता रोलची अगदी झटपट होणारी साधी-सोपी रेसिपी सांगणार आहोत.
काजू आणि पिस्ता रोल बनवण्यासाठी लागणारे साहित्य
काजू – ७५० ग्रॅम
पिस्ता – ३०० ग्रॅम
साखर चौकोनी तुकडे – ८०० ग्रॅम
वेलची पावडर – ५ ग्रॅम
चांदीचा वर्ख (सजवण्यासाठी)
कृती :
सर्वप्रथम काजू भिजवा. त्यानंतर पिस्ताची साल काढून घ्या. आता हे दोन्ही वेगवेगळे बारीक करून त्यांची पेस्ट बनवा. त्यानंतर काजूमध्ये ६५० ग्रॅम साखर आणि पिस्ताच्या मिश्रणात १५० ग्रॅम साखर घाला. आता दोन्ही मिश्रण वेगवेगळ शिजवा. या दोन्ही मिश्रणात साखर पूर्ण विरघळल्यावर त्यात वेलची पूड घाला.
आता हे मिश्रण पॅनमधून एका भांड्यामध्ये काढून घ्या. आता काजू आणि पिस्त्याचे हे मिश्रण वेगवेगळे लाटून घ्या. या दोन्ही लाटलेल्या पात्या एकावर एक ठेवून त्याचे रोल करा. ह्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेल्या विविध ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता. सगळ्यात शेवटी हे रोल्स चांदीच्या वर्खाने सजवा. आपल्या कुटुंबियांना आणि पाहुण्यांना सर्व्ह करा.