मुस्लिम आणि दलित मतांच विभाजन होण्याची शक्यता
सोलापूर:सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एमआयएम दंड थोपटणार आहे.रमेश कदम आणि फारूक शाब्दी यांच्या निवासस्थानी अकदस मंझिल येथे शुक्रवारी रात्री गोपनीय बैठक झाली.गोपनीय बैठकीत एमआयएमचे सोलापुरातील सर्व नेते उपस्थित होते.भाजपचे राम सातपुते ,काँग्रेसच्या प्रणिती शिंदे,वंचितचे राहुल गायकवाड यांच्या लढतीत एमआयएम उमेदवार देण्याच्या ठाम भूमिकेवर आहे.एमआयएमचे जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी यांनी देखील माध्यमांना माहिती देताना सांगितले,सोलापूर लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के आम्ही उमेदवार देणार आहे.मजबुत उमेदवाराची चाचपणी सुरू असून लवकरच उमेदवाराची अधिकृत घोषणा करणार आहे.रमेश कदम यांनी देखील या बैठकीला दुजोरा दिला असून माहिती देताना सांगितले,एमआयएमशी माझी चर्चा सुरू आहे.सोलापूर लोकसभा निवडणुकीत मला एमआयएमने उमेदवारी दिली तर,विकासाच्या मुद्द्यावर अधिक लक्ष देणार आहे.”मागेल त्याला पाणी” आणि “मागेल त्याला रस्ता” ही माझी संकल्पना असून याला राज्यभर व देशपातळीवर घेऊन जाणार अशी माहिती दिली.
विधानसभा निवडणुकीत व महानगरपालिका निवडणुकीत आपले अस्तित्व व जाणीव करून देणाऱ्या एमआयएमने लोकसभा निवडणुकीत लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे.सोलापूर शहर मध्यच्या विधानसभा निवडणुकीत दोन वेळा एमआयएमचा निसटता पराभव झाला होता.मुस्लिम मतांच्या जोरावर एमआयएमने सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत आठ जागांवर विजय प्राप्त केला होता.2014 पासून एमआयएमने सोलापुरात स्वतःचे वर्चस्व सिद्ध केले आहे.मागील लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचितने युती करत जबरदस्त फाईट दिली होती.प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास 1 लाख 70 हजार मत प्राप्त करत ,निवडणूकीचा निकाल बदलून टाकला होता.दलित आणि मुस्लिम मतांचा विभाजन होत,काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंचा पराभव झाला होता.कारण भाजपचे डॉ जय सिद्धेश्वर महाराज महास्वामी यांचा 1 लाख 58 हजार मतांनी विजय झाला होता.
रमेश कदम यांना मानणारा मोहोळ विधानसभा मतदारसंघात मोठा युवा वर्ग आहे.एमआयएमला सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग आहे.रमेश कदम यांच्या मागेल त्याला पाणी,मागेल त्याला रस्ता या संकल्पनेला सोलापुरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता.हीच संकल्पना पुन्हा एकदा सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे.