सोलापूर,- प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमात येत्या शनिवारी, ०४ जानेवारी २०२५ रोजी लेखक समीर गायकवाड यांच्या “खुलूस व झांबळ” या पुस्तकाचे अभिवाचन होणार असून त्यानंतर लेखक समीर गायकवाड यांची प्रकट मुलाखत होणार आहे.
“५० लाख ९४ हजार ५२१ एवढी वाचकसंख्या असलेला, ब्लॉगसाठीच्याच अनेक पुरस्कारांनी गौरवलेला लेखक म्हणजे समीर गायकवाड त्यात विशेष हे कि ते आपल्या सोलापूरचे आहेत. समीर गायकवाड हे एक आश्वासक लेखक आहेत. यांच्या पुस्तकांनी आता महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय. रेडलाईट एरिया हा तसा समाजाकडून नेहमीच उपेक्षित, तिरस्करणीय असा घटक आहे… त्या वस्तीतल्या स्त्रियांची घुसमट, त्यांच्या आशा – आकांक्षा, त्यांची हतबलता, तगमग मांडणारं पुस्तक “रेड लाईट डायरीज… खुलूस! एक अप्रतिम, वास्तववादी चित्रण.त्यांच्याच झांबळ या पुस्तकातून घनदाट माणसांचं भावविश्व उलगडणाऱ्या कथांचा हा संग्रह..!! खेड्यातलं गावजीवन, त्यातली घनदाट आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेली माणसं या कथांमधून भेटतील. जीवनमूल्यांवर अफाट विश्वास असणारी, अतूट नाती जपणारी माणसं या कथांमधून भेटतात. समीर गायकवाड यांच्या ब्लॉगमधूनही अनेक भन्नाट, वास्तववादी, प्रसंगोचित लेख वाचायला मिळतात.. !!
“खुलूस व झांबळ” पुस्तकाचे अभिवाचन संदीप जाधव व आरजे अमृत हे दोघे करणार आहेत. अभिवाचनानंतर लेखक समीर गायकवाड यांची प्रकट मुलाखत माधव देशपांडे हे घेणार आहेत. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात दिनांक ४ जानेवारी रोजी सायंकाळी ६.२५ वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल.