पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. मंत्रिमंडळातील फेरबदलापुर्वी विद्यमान मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक असू शकते, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे अनेक राज्यातील राज्यपाल आणि उपराज्यपालांच्या नियुक्त्या व भाजपमधील बदल एकाच वेळी होण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्राद्वारे पदमुक्त करण्याची विनंती केल्यानंतर राज्यभरात आता नवीन राज्यपाल कोण असणार, याबाबत चर्चा होऊ लागली आहे. येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्रासह राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पण अमरिंदर सिंग यांच्याशिवाय, राजस्थानचे भाजप नेते ओम माथुर, मध्य प्रदेशातील भाजप नेते प्रभात झा, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यही नावांची चर्चा आहे. २०१४च्या निवडणुकीत ओम माथूर हे महाराष्ट्र भाजपचे प्रभारी पदावर काम केले आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांशीही त्यांचे जवळचे संबंध आहेत. तर सुमित्रा महाजन मध्य प्रदेशातील असल्या तरी त्या महाराष्ट्रीयन आहेत आणि त्यांचे माहेर मुंबई आहे. तर अमरिंदरसिंग हे भाजपचे पंजाबमधील नेते आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना भाजपच्या जवळची आणि महाराष्ट्राची माहिती असलेल्या व्यक्तीला राज्यपाल म्हणून संधी दिली जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आता राज्यात कोण येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.