सोलापूर : माढा तालुक्यातील वैद्यकीय विभागातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष आडगळे यांना 9 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ही कारवाई केली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही 9 हजारांची लाच महिलेची प्रसूती करण्यासाठी मागितली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार व्यक्तीच्या पत्नीला कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आणण्यात आले होते. यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष आडगळे यांनी प्रसूतीसाठी 10 हजारांच्या लाचेची मागणी केली. शुक्रवारी सकाळी तडजोडीअंती 9 हजार रुपये देण्याचे ठरले.
यानंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाला याची माहिती दिली. लाचलुचपत विभागाने सापळा रचुन डॉ. आडगळे यांना रंगेहाथ पकडले. दरम्यान कारवाई करताना डॉ.आडगळे यांनी पळुन जाण्यासाठी झटापट देखील केली. मात्र, लाचलुचपत विभागाने आडगळेच्या हाती बेड्या ठोकत ताब्यात घेतले. भरपेट पगारीची नोकरी असताना देखील सामान्य गोरगरीब कुटुंबातील महिलेच्या प्रसूतीसाठी पैसे मागणाऱ्या या डॉक्टरने वैद्यकिय क्षेत्राला काळीमा फासला असुन सर्व स्तरातुन या घटनेचा निषेध होत आहे.
ही घटना निषेधार्ह अशीच आहे
महिलेची प्रसूती करण्यासाठी वैद्यकिय अधीक्षक दहा हजार रुपये मागत असल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. या तक्रारीवरुन सापळा रचून डॉ.आडगळे यांना ताब्यात घेतले. सध्या आडगळेविरोधात कायदेशीद कारवाई सुरू केली आहे. कविता मुसळे, पोलिस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर.