लाच कशासाठी मागितली जाते?
शासनाने नेमून दिलेले पब्लिक ड्युटी चे काम एखाद्याच्या favour मध्ये करण्यासाठी किंवा ते न करण्यासाठी किंवा ते होऊ न देण्यासाठी लाच आणि एखादे काम पूर्ण करून दिल्याबद्दल किंवा ते होऊ न दिल्याबद्दल बक्षिसाची स्वरूपात लाच मागितली जाते. वर नमूद प्रमाणे कामासाठी लाच मागणाऱ्या विरुद्ध तक्रार प्राप्त झाल्यास ACB ट्रॅप कारवाई करते.
अशी कारवाई कोणत्या व्यक्ती विरुद्ध होऊ शकते?
1) ज्या लोकसेवकाने लाच मागितली त्या लोकसेवकाविरुद्ध
2) लोकसेवकाच्या सांगण्यावरून इतर कोणत्याही लोकसेवकाने/ खाजगी व्यक्तीने लाच मागितली त्या लोकसेवक/ खाजगी व्यक्तीविरुद्ध
3) एखाद्या कार्यालयातील लोकसेवकाची ओळख आहे असे सांगून किंवा लोकसेवकावर प्रभाव पाडून काम करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध (एजंट/मध्यस्थी करणारे व्यक्ती, प्रभावी व्यक्ती—मग असे व्यक्ती खाजगी व्यक्ती किंवा दुसरा लोकसेवक सुद्धा असू शकतात)
व्हेरिफिकेशन
लाच मागणीची तक्रार प्राप्त झाल्यावर ट्रॅप लावण्यापूर्वी पहिल्या टप्प्यात व्हेरिफिकेशन केले जाते
:- ज्यात तक्रारदारास लोकसेवकाकडे व्हॉईस रेकॉर्डर व पंचासह पाठवून लोकसेवकाची/खाजगी व्यक्तीची लाचेची मागणी आहे किंवा नाही खात्री केली जाते.
लोकसेवकाकडून/खाजगी व्यक्ती कडून मागणी POSITIVE आल्यासच दुसऱ्या टप्यात ट्रॅप लावला जातो.
व्हेरिफिकेशन स्पष्टपणे negative असेल म्हणजे लोकसेवकाने/खाजगी व्यक्तीने प्रत्यक्ष भेटीत लाचेची मागणी केली नाही तर कार्यवाही बंद केली जाते.
ACB कारवाई मध्ये आरोपी केव्हा केले जाते?
ACB ने केलेल्या व्हेरिफिकेशन/सापळा कारवाई दरम्यान
1) लोकसेवकाने स्वतः डायरेक्ट तक्रारदाराकडे लाच मागणे व नंतर सापळा कारवाई दरम्यान लाच स्वीकृती करणे किंवा
काही वेळा फक्त लाच मागणी करणे.
2) दुसऱ्या लोकसेवकाच्या/खाजगी व्यक्तीच्या लाच मागणीस/लाच मागणी व स्वीकृतीस सहमती दर्शविणे किंवा त्यांच्या कृतीस प्रोत्साहनपर असे काही असे स्वतः बोलून किंवा कृती करून दुजोरा देणे
( कृती– कागदावर लाचेच्या रकमेचा आकडा लिहून/mobile, calculator वर आकडा दाखवून कींवा हाताची बोटे दाखवून किंवा इतर अन्य कृती (प्रत्यक्ष किंवा फोन कॉल वरून)
3) लोकसेवकाची ओळख आहे असे सांगून किंवा लोकसेवकवर प्रभाव पाडून काम करून देतो म्हणून एखादया व्यक्तीने तक्रारदाराकडे लाच मागणी करणे व नंतर स्विकृती करणे. किंवा काही वेळा फक्त मागणी करणे.
अशा प्रकारचे संभाषण/कृती ACB कारवाई दरम्यान रेकॉर्डवर येते तेव्हा ते कृती केलेले/बोललेले लोकसेवक व संबंधित इतर सर्वजण आरोपी होतात.
संभाषण व कृती
व्हेरिफिकेशन केले जाते तेव्हा लोकसेवकाने काय बोलावे आणि काय बोलू नये, काय कृती करावी काय व काय कृती करू नये हे फक्त त्याच्या स्वतःच्याच हातात आहे. त्यावर दुसऱ्याचे नियंत्रण नसुच शकते.
भ्रष्टाचारास वाव मिळणारी परिस्थिती
बऱ्याच वेळी लोकसेवकाला त्याच्या नियंत्रणाखालील कर्मचारी/अधिकारी यांची चूक सुद्धा कळत नकळत अंगलट येऊ शकते.
बरेच लोकसेवक त्यांचे दैनंदिन कर्तव्य/कामकाज करताना स्वतः किंवा इतरमार्फत मुद्दामहून वर्तनातून/कृतीतून कारवाईची/काम न होण्याची भिती दाखवून अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करतात जेणे करून समोरच्याला असे जाणवू लागते की लोकसेवक पैसे/लाच घेण्यासाठीच त्यांच्या सोबत असे वागत आहे.
थोडक्यात बऱ्याचदा भ्रष्टाचारास वाव मिळेल अशी परिस्थती लोकसेवकाकडून स्वतः किंवा आपल्या अधिनस्त कर्मचारी/अधिकारी/खाजगी व्यक्ती मार्फत निर्माण केली जाते.
🔷 ACB ट्रॅप कारवाई टाळण्यासाठी काय करता येईल? 🔷ट्रॅप होण्याची अनेक कारणे असू शकतात परंतु अशा अप्रिय घटना टाळण्यासाठी जाणीवपूर्वक काही प्रयत्न करणे आपल्या हातात असते.
➡️ प्रभारी अधिकारी/कार्यालय प्रमुख म्हणून काम करताना पीडित/तक्रारदार/अर्जदार/गैरअर्जदार हे त्यांचा प्रकरणाच्या कामासंबंधाने आपल्याला भेटण्यासाठी स्वतः एकटे येतात किंवा आपले अधिनस्त अधिकारी/कर्मचारी हे अर्जदार/गैरअर्जदार यास आपल्याकडे घेऊन येतात किंवा त्याला एकट्याला पाठवून देतात अशावेळी खालील गोष्टीबाबत आपल्याला काही माहिती नसते
सदर अर्जदार/गैरअर्जदार आपल्याकडे येण्यापूर्वी
1) आपले अधिनस्त अधिकारी/कर्मचारी आणि अर्जदार/गैरअर्जदार यांच्यात काय काय बोलणे झाले आहे ?
2) त्यास परस्पर कोणी पैशाची मागणी केली आहे किंवा कसे ?
(त्यास आपले नाव सांगून पैशाची मागणी केली असण्याची शक्यता सुद्धा असते)
किंवा
3) त्यास काहीतरी उलट सुलट बोलून भीती दाखविलेली आहे अगर कसे?
म्हणून प्रत्येक वेळी प्रभारी /कार्यालय प्रमुख म्हणून आपले बोलणे व कृती कायदेशीरच पाहिजे.
जर अर्जदार/गैरअर्जदार यांच्या भेटीत त्यांच्या संबधीत प्रकरणात भ्रष्टाचाराला वाव मिळण्यासारखी परिस्थीती निर्माण झाली असण्याची थोडी जरी शंका वाटत असेल तर त्यांना कामासंबधी कायदेशीर बाबी समजावून सांगून त्या कामासाठी कोणालाही पैसे देण्याची अजिबात आवश्यकता नसल्याचे स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे.
(अशाप्रकारे स्पष्टपणे बोलण्यास अजिबात संकोच करू नये मग अर्जदार/गैरअर्जदार एकटा असेल किंवा त्याचा सोबत आपला अधिनस्त अधिकारी/कर्मचारी असेल तरीही)
➡️ज्या प्रकरणात भ्रष्टाचाराला वाव मिळण्याची शक्यता वाटते अशा सर्व प्रकरणाचा विशेष प्राधान्याने पाठपुरावा करून त्वरित कायदेशीर निपटारा करून टाकणे. ( विनाकारण प्रलंबित न ठेवणे )
➡️ प्रभारी म्हणून काम करताना स्वतः नेहमी जनतेसाठी direct उपलब्ध असणे त्यांना वेळ देणे त्यांच्या अडचणी/तक्रारी समजून घेणे. त्यांना शक्यतो कायदेशीर सर्व मदत करणे. काही प्रसंगी कायदेशीर तरतुदी आणि त्यांचे काम याबाबत त्यांना व्यवस्थित माहिती देऊन त्यांचे समाधान करणे. यामुळे कार्यक्षेत्रातील जनतेत असा संदेश जातो की प्रभारी अधिकारी सर्वांचे ऐकून घेऊन कायदेशीर सर्व मदत करतात आणि असा विश्वास जनतेत निर्माण झाला तर आपल्या अधिनस्त अधिकारी/कर्मचारी यांच्या कडून होणाऱ्या त्रासाबद्दल इतरत्र तक्रार करण्यासाठी जाण्यापुर्वी जनतेला प्रभारी अधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी सांगु वाटतात, त्यांच्याकडून बऱ्याचदा विविध प्रकारची आगाऊ महत्वाची माहिती मिळते ज्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात अनेक अनुचित घटना टळू शकतात.
➡️ दुसऱ्यांना बघून स्वतः गैरमार्गाने पैसे मिळविण्याच्या स्पर्धेत सहभागी न होणे.
स्वतःच्या आर्थिक परिस्थितीची तुलना अशा स्पर्धेत सहभागी असलेल्या इतरांशी कधीच न करणे. समाधानी राहणे
➡️ लोकसेवकाने आपले कर्तव्य/कामकाज पार पाडताना आपले बोलणे व कृती नेहमी कायदेशीरच ठेवणे (प्रत्यक्ष व फोनवर बोलताना सुद्धा)
➡️तसेच आपल्या कर्तव्याशी संबंधित असलेल्या कामकाजात भ्रष्टाचाराला वाव मिळणार नाही, तशी परिस्थिती निर्माण होणार नाही किंवा कोणी *अधिनिस्त अधिकारी/कर्मचारी तसे करणार नाही यादृष्टीने चौकस राहणे आणि त्यांना जवाबदारीने वागण्यास परावृत्त करणे.
(अशोक गिते) पोलीस निरीक्षक (102)