हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या चिंताजनक स्थितीचा भारताला मोठा फटका बसला असून २०११-२०२० या दशकात अतिवृष्टी, अतिउष्णता अनुभवण्यास मिळाली, असे निरीक्षण जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालात नोंदवण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या हवामानासंबंधी परिषदेत मंगळवारी हा अहवाल जाहीर करण्यात आला. ‘हवामानाची दशकभरातील स्थिती २०११-२०२०’ या अहवालात आणखी अनेक बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच, गेल्या आठवड्यामध्ये हवामान बदल परिषदेत सन २०२३चा हंगामी वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला. त्यानुसार २०२३ हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरेल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला.