सोलापूर – येथील नामांकित उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या वरिष्ठ मार्गदर्शिका दीप्ती शहा तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या आरंभी श्राविका संस्थेच्या संस्थापिका पंडिता पद्मश्री सुमतीबाई शहा व उमाबाई श्राविका विद्यालयाच्या प्रथम मुख्याध्यापिका विद्युलता शहा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रशालेतील संगीत संचाद्वारे गायलेल्या सुमधुर स्वागतगीताद्वारे अतिथींचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य सुकुमार मोहोळे सर यांनी प्रास्ताविकेतून गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले व प्रशालेच्या आजी-माजी शिक्षकांच्या संवाद कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. त्यांनी प्रशालेच्या माजी शिक्षकांसमोर विद्यालयाच्या कामगिरीचा चढता आलेख मांडला. सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्यरूपी मजबूत पायामुळे प्रशालेला यशाचे उंच शिखर गाठता आले असे गौरवोद्गार काढले. प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित व पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांनी आपल्या खास शैलीत उपस्थित माजी शिक्षकांचा परिचय करून दिला. इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे औक्षण, बुके व भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. पारंपरिक पद्धतीचा कृतज्ञता सोहळा पाहून मान्यवर भारावून गेले. याप्रसंगी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त केलेल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना अमूल्य असे अनुभवामृत प्रदान केले. संस्थेच्या संस्थापिका पद्मश्री सुमतीबाई शहा, विद्युलता शहा, काकाजी, हर्षवर्धनजी शहा यांच्या आठवणी जाग्या केल्या व प्रशालेतील अविस्मरणीय प्रसंगांना उजाळा दिला. यावेळी इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कु. रामेश्वरी बंडगर व कु. श्रद्धा कांबळे या विद्यार्थिनींनी आपली भाषणे सादर केली. तत्पूर्वी उपस्थित सर्व माजी शिक्षकांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करून सन्मानपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे सर यांच्या अभिनव संकल्पनेतून आजी-माजी शिक्षकांचा परिचय व शैक्षणिक चर्चासत्र संपन्न झाले. यावेळी प्रशालेत सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली गेली. नव्यानेच सुरू केलेल्या स्मार्ट बोर्डद्वारे श्राविका संस्थेच्या वाटचालीवर आधारित प्रशालेतील सहशिक्षक अनंत बळळे, अभिजीत पाटील, ऋषभ सोनटक्के यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या

‘हिस्ट्री ऑफ श्राविका’ ही चित्रफित उपस्थितांना दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख माधवी खोत व प्रीती वऱ्हाडे यांनी तर आभार सोनल आळंद यांनी मानले. फलक लेखन प्रवीण कंदले तर व क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे सहकार्य लाभले तर कार्यक्रमस्थळी सुंदर रांगोळीचे रेखाटन केतकी सोनटक्के, सरस्वती शेटे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.