सोलापूर, दि. ७- वाचता वाचता आपणच उत्तम साहित्याचे आपल्यापुरते निकष बनवावेत आणि पुस्तकाचे मूल्यमापन आपणच करावे आणि असे करता करता आपल्यातला राजहंस तयार करावा. म्हणजे योग्य आणि अयोग्याची निवड करता येते. असा उत्तम वाचकच पुढे उत्तम लेखकही होऊ शकतो असे मत लेखक संजय भास्कर जोशी यांनी व्यक्त केले.

निर्मलकुमार फडकुले सभागृहात “प्रिसिजन वाचन अभियान” कार्यक्रमात लेखक संजय भास्कर जोशी यांनी ‘आमंदाने वाचू चला…’या विषयावर उपस्थितांशी दिलखुलास गप्पा मारल्या. प्रारंभी लेखक संजय भास्कर जोशी यांचे डॉ सुहासिनी शहा यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. सुप्रिया केदार केसकर यांनी “माझा वाचन प्रवास” या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.
पुस्तक वाचनाचे तंत्र समजावून सांगताना संजय जोशी यांनी वाचनाची आठ सूत्रे सांगितली. स्वानंदासाठी वाचा, मातृभाषेवरचं प्रेम वाचनातून व्यक्त करा, पुस्तक हे मुखपृष्ठ, अर्पण पत्रिका, प्रस्तावना ते शेवटच्या ब्लरपर्यंत मनापासून आस्वाद घेत वाचा, लेखकाला मनापासून दाद द्या, तुमची दाद लेखकाची उमेद, ऊर्जा, उत्साह वाढवेल, वाचलेल्या चांगल्या पुस्तकांचा प्रसार करा, भेट म्हणून पुस्तके द्या. वाचलेल्या पुस्तकांविषयी स्वतःचं मत, चांगले उतारे लिहून ठेवा, त्यातूनच वाचक म्हणून आपल्यातला राजहंस जागा होईल – योग्यायोग्यतेची निवड करायला लागेल. उत्तम वाचक हाच पुढे जाऊन उत्तम लेखक होऊ शकतो.. असे प्रतिपादन संजय भास्कर जोशी यांनी केले.
पुस्तक वाचावं कसं, याचं तंत्रच त्यानी आपल्या सादरीकरणातून सांगितलं. जे पुस्तक आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला काहीतरी नवीन शिकवतं ते पुस्तक श्रेष्ठ मानावं. म्हणूनच शामची आईसारखी पुस्तकं कालातीत ठरतात. प्रत्येक कलाकृतीच्या बाबतीत हा निकष लागू शकतो. अशी श्रेष्ठ पुस्तकं वाचताना आपण वाचक, रसिक म्हणूनही समृध्द होत असतो. श्रीमंत होत असतो, असे संजय जोशी यांनी सांगितले.
कार्यक्रमात दिवंगत अष्टपैलू लेखक आणि क्रिकेट समालोचक द्वारकानाथ संझगिरी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माधव देशपांडे यांनी केले.
प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमातच अरण्यऋषि मारूती चित्तमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याप्रित्यर्थ सन्मान करण्याचे योजिले होते. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे चित्तमपल्ली कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या घरी जाऊन आम्ही सन्मान करू असे डॉ. सुहासिनी शहा यांनी सांगितले.