सोलापूरच्या दुपारची कडक उन्हाळी तलखली निववू पाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याने रस्त्यावरचा पाचोळा आसमंतात गिरक्या घेत होता, भवतालातील ताप नाहीसा होऊन वातावरण हळूहळू सुशीतल होत होते. शनिवारची (तारीख २६ एप्रिल) संध्याकाळ अशी वेगळ्याच लय – तालात उगवत होती. हुतात्मा स्मृती मंदिराचे सभागृह रसिकांनी तुडुंब भरलेलं!
रंगमंचावर अर्पित कथ्थक नृत्यालयाच्या बाल, तरुण, प्रौढ अशा सर्व वयोगटातील नृत्यांगनांनी आपले वय त्यागून नृत्यछटांनी माहौल लयबध्द केला होता, इतका की सभागृहात उशिरा प्रवेश करणारा प्रेक्षकदेखील, हातातल्या मोबाईलच्या प्रकाशात दिसेल त्या रिकाम्या खुर्चीच्या दिशेने तालबद्ध पावले टाकतोय की काय असे वाटत होते! कुणाला यात अतिशयोक्ती वाटू शकेल, पण तो अनुभव हेच विदित करत होता. मनीषा जोशी, रिद्धि जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेले परिश्रम ठायी ठायी दिसत होते.
स्वमग्न कलावंतांनी केलेले नृत्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. त्यांच्या एकमेकांना सावरून, सांभाळून घेण्यातही लय होती. आजच्या कार्यक्रमातील ते सर्वात उत्तम नृत्य होते!
स्वतः मनीषा यांनीही आपल्या खास नृत्याने कार्यक्रमाचा शैलीदार प्रारंभ केला. त्यानंतर एकाहून एक सरस नृत्याविष्कार झाले. रिद्धि आणि तिच्या कन्येच्या सहभागाने ३ पिढ्या मंचावर अवतरल्या होत्या! सोलापूरची गुणी कलावंत अमलू तथा ममता बोल्लीने उत्तम निवेदन तर केलेच, पण तिचा आत्मविश्वास, स्वतःचा नृत्याभ्यास त्यातून दिसत होता. ही बुद्धिमान तरुणी कार्यक्रम अधिकाधिक उंचीवर नेण्यासाठी झटत होती.
प्रेक्षकांचा उत्फुल्ल प्रतिसाद हे या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य! पहिल्या रांगेपासून शेवटच्या रांगेपर्यंत रसिक उत्सुकतेने कार्यक्रम पाहत होते. दाद देत होते.
अवघ्या ४ वर्षाच्या छोट्या मुलीपासून ५५ वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा नृत्यातील सहभाग उल्लेखनीय होता. नृत्याला साजेशी प्रकाश योजना मंच उजळवून टाकत होती तर संदीप कुलकर्णी आणि त्याच्या गायक व वादक चमूने समारंभ श्राव्य केला! ही नृत्यमय झालेली संध्याकाळ चिरस्मरणीय झाली.
