सोलापूर, दि. 24: श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी, अरण, ता. माढा, जिल्हा सोलापूर या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी रुपये 100 कोटीचा प्रस्ताव मागविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यापूर्वी दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याशिवाय, मुख्यमंत्री यांच्या हस्ते दि. 4 ऑगस्ट 2024 रोजी अरण येथे भूमीपूजन समारंभ पार पडला. या वेळी मुख्यमंत्री यांनी या तीर्थक्षेत्रास अ वर्ग दर्जा तसेच रुपये 100 कोटी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती.
ग्रामविकासमंत्री यांच्या निर्देशानुसार, श्रीक्षेत्र संत सावता महाराज संजीवन समाधी मंदिर, अरण, ता. माढा, जि. सोलापूर या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनास तात्काळ सादर करावा, असे निर्देश शासनाने दिलेले आहेत.