विद्यार्थ्यांकडून सदाबहार नृत्याचे सादरीकरण!
सांगोला – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २१व्या युवा महोत्सवाला सांगोला महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगतदार सुरुवात झाली असून, गुरुवारी सायंकाळी पार पडलेल्या लोकनृत्याच्या स्पर्धांनी संपूर्ण परिसरात सांस्कृतिक रंगांची उधळण केली.

भारतीय संस्कृतीतील विविधतेचे दर्शन घडवणाऱ्या या स्पर्धेत १४ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत, पारंपरिक गीतांवर सादर केलेल्या नृत्यांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. विविध प्रांतांतील लोकजीवन, उत्सव आणि परंपरांचे चित्र उभे करणाऱ्या या नृत्य सादरीकरणांनी वातावरण मंत्रमुग्ध करून टाकले. सुरुवातीला भारत महाविद्यालय जेऊर येथील विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्य सादर केले. मनोहारी वेशभूषा, जीवंत अभिनय आणि तालबद्ध हालचालींनी मंचावर उर्जेचा झंझावात निर्माण केला. त्यानंतर कंदलगावच्या असेंट कॉलेजने राजस्थान प्रांतातील बहारदार नृत्याविष्कार घडविला. या विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना भारावून टाकले. बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील अतिशय सुंदररित्या अनोख्या नृत्याचे दर्शन घडविले. यावेळी अनेक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी आणि ग्रामीण जीवनशैलीचे रंग भरणारे नृत्य सादर करून दाद मिळवली. संगमेश्वर कॉलेज सोलापूर, दयानंद महाविद्यालय सोलापूर, अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील अतिशय दर्जेदार लोकनृत्याचे यावेळी दर्शन घडविले.


यावेळी युवा महोत्सवातील संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण आणि रंगतदार झाले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपापल्या कलागुणांनी सजवलेली ही नृत्य मैफल म्हणजे एक प्रकारचे ‘भारत दर्शन’च ठरले. यामधून विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धेत सहभाग घेतला नाही, तर भारतीय सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याचे कार्यही केलं. या महोत्सवाच्या निमित्ताने सांगोल्यात सध्या सांस्कृतिक आनंदाचे मोठे वातावरण तयार झाले असून, प्रेक्षकांपासून आयोजकांपर्यंत सर्वत्र समाधानाची आणि अभिमानाची भावना आहे.