——————————–
गांधीवादी नेत्या हरपल्या
सोलापूर – ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, दिवंगत माजी खासदार तुळशीदासदादा जाधव यांच्या कन्या, येथील काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व माजी आमदार निर्मलाताई शंकरराव ठोकळ (वय ८७) यांचे आज (मंगळवारी) सकाळी नऊ वाजता खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या वृद्धापकाळाने आजारी होत्या. त्यांचे पार्थिव मुरारजी पेठ येथील तोरणा बंगला येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता पुणे रोड, बाळे स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात ॲड. विपीन व सचिन ही दोन मुले, डॉ. सुनिता व शिल्पा या सुना व नातवंडे असा परिवार आहे.
निर्मलाताई ठोकळ यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दीर्घकाळ सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय कामगिरी बजावली होती. त्यांचा सहज-सरळ स्वभाव, लोकाभिमुख कार्यपद्धती व महिलांच्या प्रश्नांवर घेतलेली ठाम भूमिका यामुळे त्यांचा जनसामान्यांत प्रभाव होता.
त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सन २००६ साली सोलापुरात झालेल्या ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या कार्याध्यक्ष होत्या. हे संमेलन सोलापुरात भरविण्यासाठी त्यांनी मोठा पुढाकार घेतला होता. अनेकांचा विरोध झुगारून त्यांनी हे संमेलन यशस्वी करून दाखवते. त्यावेळी त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक झाले होते.
त्यांनी विधानसभा व विधान परिषदेतही काम पाहिले आहे.
माजी विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्य राहिलेल्या निर्मलाताई ठोकळ यांचा जन्म २४ एप्रिल १९३८ रोजी झाला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि खासदार स्व. तुळशीदास दादा जाधव यांच्या निर्मलाताई ठोकळ या कन्या. सोलापूर महानगरपालिकेत १९६२ ते १९६७ आणि १९६९ ते १९७४ अशा दोन टर्म त्या सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक होत्या. १९७२ ते १९७८ या कालावधीत त्यांची विधानसभेवर निवड झाली तर १९८२ ते १९८८ या कालावधीत त्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्य होत्या. विधान परिषदेच्या आश्वासन समितीचे प्रमुख म्हणून तसेच पंचायत राज व अन्य समित्यांवर देखील त्यांनी काम केले. सोलापूर जिल्हा महिला सहकारी बँकेच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या .महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संस्थापक संचालक म्हणून त्यांनी १९७५ ते १९८४ या कालावधीत काम पाहिले. १९६८ पासून ते दीर्घकाळ इंदिरा महिला जीवन विकास सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या त्या चेअरमन होत्या. महिला प्रबोधिनी या मासिकाच्या संस्थापक संपादक म्हणून त्या कार्यरत होत्या. १९९२ ते १९९८ या कालावधीत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील त्या संचालक राहिल्या आहेत.
२००४ ते २००६ या कालावधीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या त्या उपाध्यक्ष होत्या.
माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांच्या पत्नी स्व. कलावतीताई या त्यांच्या ज्येष्ठ भगिनी तर त्यांचे पुत्र उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले हे त्यांचे भाचे होत.
श्रीमती निर्मलाताई ठोकळ यांचा अल्प परिचय
जन्मतारीख -२४ एप्रिल १९३८
पती- स्व. शंकरराव ठोकळ, माजी जिल्हा सरकारी वकील
वडिल – स्व. तुळशीदासदादा जाधव ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, माजी खासदार
सोलापूर महानगरपालिका सदस्य १९६२ ते १९६७ आणि १९६९ ते १९७४.
महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित १९७२ ते १९७८
महाराष्ट्र विधान परिषद सदस्य १९८२ ते १९८८
विधानपरिषदेच्या आश्वासन समिती प्रमुख म्हणून तसेच पंचायत राज व अन्य समित्यांवर काम केले.
सोलापूर जिल्हा महिला सहकारी बँकेच्या संस्थापक अध्यक्ष.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संस्थापक संचालक (१९७५ ते १९८४)
संस्थापक स्व. श्री तुळशीदास जाधव सार्वजनिक वाचनालय २००७
इंदिरा महिला जीवन विकास गृहनिर्माण सहकारी संस्था चेअरमन (१९६८)
महिला प्रबोधिनी या मासिकाच्या संस्थापक संपादक.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक संचालक-१९९२-१९९८.
सोलापूर येथील २००६ मधील ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्ष.
उपाध्यक्ष-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी २००४ ते २००६