उद्योगवर्धिनी संस्थेला २१ वर्षे पूर्ण : स्नेहमिलन कार्यक्रमासाठी सोलापूरकरांची तुडुंब गर्दी
समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित महिलांची होणारी परवड ते अक्षरश: हजारो महिलांची आर्थिक स्वयंपूर्णता असा कौतुकास्पद उलगडत गेलेला प्रवास आणि त्या नाट्यमय प्रवासाला सोलापूरकरांची उत्स्फूर्तपणे मिळालेली दाद अशा चैतन्याने भारलेल्या वातारणात नाट्याविष्कारातून उद्योगवर्धीनी संस्थेच्या २१ वर्षांच्या स्त्री सक्षमीकरणाच्या प्रवासाचे दर्शन सोलापूरकरांना घडले. तब्बल २० हजार गरजू महिलांना स्वावलंबी बनविणाऱ्या उद्योगवर्धिनी संस्थेला २१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुक्रवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित स्नेहमिलनास सोलापूरकरांनी तुडुंब गर्दी केली होती.

प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक उदय तथा तात्या जोगळेकर, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार प्रमोद कुलकर्णी, उद्योगवर्धिनी संस्थेच्या सचिवा मेधा राजोपाध्ये यांच्या हस्ते भारतमातापूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार प्रमोद कुलकर्णी म्हणाले, महिला मृदू, हळवी, संवेदनशील असली तरी कठीण परिस्थितीत अत्यंत कठोरपणे संकटांचा सामना स्त्रीच करु शकते. राष्ट्रमाता जिजामाता आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे मोठे आदर्श आपल्यासमोर आहेत. चंद्रिका चौहान यांनी एकट्याने सुरू केलेला प्रवास हजारो महिलांच्या साथीने २१ वर्षांमध्ये यशस्वी झाला ही कौतुकास्पद बाब आहे. यासाठी चंद्रिका चौहान यांचे उत्तम संघटन, नवीन शिकण्याची वृत्ती हे गुण वाखाणण्याजोगे आहेत, असेही कुलकर्णी म्हणाले.
यानंतर उद्योगवर्धिनी संस्थेला २१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘मी ते आम्ही’ – प्रवास उद्योगवर्धिनीचा’ हा नाट्यरूपातील कार्यक्रम सादर झाला. या नाट्याविष्कारात उद्योगवर्धीनी संस्थेच्या १५० महिला कलाकारांनी सहभाग घेत विविध प्रसंग सादर केले. अश्विनी तडवळकर यांनी याचे लेखन तर आमीर तडवळकर यांनी दिग्दर्शन केले.’मी ते आम्ही’ – प्रवास उद्योगवर्धिनीचा’ या नाट्याविष्कारात चंद्रिका चौहान यांचे बालपण, हलाखीचे दिवस, गरजू महिलांना सोबत घेऊन आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी केलेली धडपड, कौटुंबिक हिंसाचारातून महिलांची केलेली मुक्तता, रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी केलेले मार्गदर्शन आणि सहाय्य, उद्योगवर्धीनी संस्थेची स्थापना, हजारो महिलांना मिळवून दिलेला रोजगार, कम्युनिटी किचन, फराळ, शिवणकाम आदींच्या माध्यमातून महिलांना दिलेली स्वयंपूर्णता, अन्नपूर्णा क्षुधाशांती योजना, शिलाई प्रशिक्षण व उत्पादन, मंगलदृष्टी भवन, सेवा पाथेय प्रकल्प, विविध बचतगटांना मार्गदर्शन व प्रशिक्षण, शांतसंध्या, समुपदेशन केंद्र आदी सेवाभावी प्रकल्पांची माहिती नाट्याविष्काराच्या माध्यमातून साकारण्यात आली. या नाट्यप्रसंगांना सोलापूरकरांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी प्रास्ताविक केले. अंजली बलदवा यांनी सूत्रसंचालन तर ॲड. गीतांजली चौहान यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान, उपाध्यक्षा शोभा श्रीवास्तव, सचिवा मेधा राजोपाध्ये, खजिनदार वर्षा विभूते, संचालिका मृणालिनी भूमकर, ॲड. गीतांजली चौहान, सुलोचना भाकरे, गौरी मुळे, दीपाली देशपांडे, शुभांगी बुवा, स्मिता लाहोटी, कांचना श्रीराम, मीनाक्षी सलगर, वृषाली कुलकर्णी, जयश्री भोसले,आदी उपस्थित होत्या.
आगळा वेगळा सत्कार
या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांना सन्मानचिन्हासोबत उद्योगवर्धीनीच्या महिलांनी तयार केलेल्या सोलापुरी चादरीपासून बनवलेले जॅकेट, खणाचा शेला तसेच विविध खाद्य पदार्थ देऊन त्यांचा अनोखा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व सोलापूरकरांनाही उद्योगवर्धिनी संस्थेने बनवलेले गोमय साबण आणि खाद्यपदार्थ भेट देण्यात आले.