दिल्ली – हरयाणाची सीमा असलेल्या सिंघू सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झालेली दिसून येतेय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शेतकरी आंदोलकांचा निषेध करणारी गर्दी इथे जमा झालेली दिसतेय. या गर्दीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर दगडफेक केली तसंच त्यांचे तंबूही नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला.
शुक्रवारी दुपारी मोठ्या संख्येत पोलीस कुमक तैनात असताा जवळपास २०० लोकांनी या ठिकाणी पोहचून आंदोलकांवर दगडफेक केली. तसंच अनेक तंबू उखडले, फाडले. परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. शुक्रवारी दुपारी २.०० वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. या गर्दीकडून शेतकरी आंदोलकांना ‘देश के गद्दार’ म्हणत हिणवलं गेलं. काही वेळातच या गर्दीनं आंदोलनस्थळी तोडफोड सुरू केली. त्यानंतर दोन्ही बाजुंकडून दगडांचा वर्षांव सुरू झाला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला.यादरम्यान एसएचओ अलीपूर प्रदीप पालीवाल हे या झडपे दरम्यान जखमी झाल्याचंही समजतंय. या हल्ल्यात पालीवाल यांच्या हातावर तलवारीचा वार झाला आणि हातातून रक्त वाहू लागलं.