येस न्युज मराठी नेटवर्क : करोनाच्या संकटकाळात गर्दी टाळण्यासाठी विविध बाबींवर घालण्यात आलेले निर्बंध आता कमी केले जात आहेत. दरम्यान, यापूर्वीच चित्रपटगृह आणि जलतरण तलाव मर्यादीत स्वरुपात खुले करण्यास परवानगी देण्यात आली होती. हे आता अधिक क्षमतेने वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून याबाबत एसओपी जाहीर करण्यात येणार आहे.
गृह मंत्रालयाने नवी एसओपी जाहीर करत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले की, निरिक्षण, कंटेन्मेंट झोन आणि सुरक्षेबाबत जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हे निर्देश १ फेब्रुवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत लागू असणार आहेत.
त्याचबरोबर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कन्टेंमेंट झोनबाहेर सर्व व्यवहारांना परवानगी असेल. सामाजिक, धार्मिक, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांना राज्यांच्या एसओपींप्रमाणे परवानगी दिली जाईल.
राज्यांतर्गत तसेच आंतरराज्यीय प्रवासादरम्यान वस्तू नेण्यास कोणतेही प्रतिबंध असणार नाही. यासाठी कोणत्या वेगळ्या परवानगीची गरज नाही. तसेच आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्यावर जोर देण्यात आला.