येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोना महामारीमुळे आषाढी, कार्तिकी, चैत्र वारी झाली नाही. शासन सुचने नुसार सर्व वारकरी मंडळीनी आपली परंपरा सांभाळली. सध्या कोरोना लसीकरण सुरु झाल्यामुळे माघवारी होईल अशी वारकरी वर्गात चर्चा सुरु आहे. ही वारी शासन आदेशानुसार व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुधाकर इंगळे महाराज व शिष्ट मंडळाने भेट घेऊन चर्चा केली. माघवारी ही परंपरा खूप मोठी असून निष्ठेने केली जात आहे. ” पंढरीचा वारकरी | वारी चुको नेदी हरि || ” या निष्ठेने दर वर्षी वारकरी पायी चालत पंढरपूर कडे जातात.
संपदा सोहळा नावडे मनाला | अशी वृत्ती प्रत्येक वारकरी भाविकाची असते. सांसारिक अडचणी, व्यावहारिक अडचणी बाजूला ठेऊन वारीला प्राधान्य देतात. प्रारब्ध म्हणून संसाराचा स्वीकार करून प्रयत्न पूर्वक व निष्ठेने वारी करणे हा वारकरी स्वभाव पाहावयास मिळतो. त्यामुळे वारी व्हावी यासाठी भाविक वारकरी मंडळा कडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी लक्ष्मण पाटील, आदर्श इंगळे, गुरुसिद्ध गायकवाड, इ.पदाधिकारी उपस्थित होते.