मुंबई : “नवी दिल्लीत जे घडतंय त्याला समर्थन नाही. पण ते का घडतंय? याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. शांततेने आंदोलन करणारा शेतकरी संतप्त का होतो याची जबाबदारी घ्यायला हवी होती. केंद्र सरकारने अजूनही शहाणपणा दाखवावा. कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये,” असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.