नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड वेळी अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. शेतकर्यांच्या गटाने थेट ऐतिहासिक लाल किल्ल्यावरही आपला ध्वज फडकवला. या घटनेचा चहुबाजूने निषेध केला जात आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकासाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या. कोणाचा राजीनामा मागणार? सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवार की जो बायडनचा? या घटनेनंतर राजीनामा तर बनतो, अशी टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली.
संजय राऊत पुढे म्हणाले की, दिल्लीत जे झाले आहे त्याला कोणीही पाठिंबा देऊ शकत नाही. सरकारला हवे असते तर आजचा हिंसाचार रोखता आला असता. दिल्लीत जे चालले आहे त्याचे समर्थन कोणीच करू शकत नाही. लाल किल्ला आणि तिरंग्याचा अपमान कोणीही सहन करणार नाही. पण वातावरण का बिघडले? सरकार शेतकरीविरोधी कायदा रद्द का करत नाही? कोणतीही अदृश्य शक्ती राजकारण करत आहे का? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.