येस न्युज मराठी नेटवर्क । “धनंजय मुंडेंवर झालेला बलात्काराचा आरोपही धक्कादायक होता आणि ज्यापद्धतीने तक्रार मागे घेतली ते देखील तितकंच धक्कादायक आहे. बलात्काराचा गंभीर आरोप करुन नंतर तक्रार मागे घेतल्यामुळे खऱ्या पीडितांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलेल, त्यामुळे खोटे आरोप केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रेणू शर्मांवर तात्काळ कारवाई करावी” अशी मागणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेली बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतल्याचं वृत्त येताच चित्रा वाघ यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली. “खोटे आरोप करणं, खोटे गुन्हे दाखल करणं चुकीचंच आहे. खोट्या आरोपांमुळे राजकीय कार्यकर्ता असूदे किंवा सामान्य माणूस तो उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही, आणि अशाप्रकारे जर महिला खोटे आरोप-गुन्हे दाखल करत असतील तर त्यामुळे खऱ्या पीडित महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो…हे समाजाच्या हिताचं नाहीये. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खोटे आरोप लावणाऱ्या रेणू शर्मावर तात्काळ IPC192 नुसार कारवाई करावी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.