येस न्युज मराठी नेटवर्क : ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपा व शिवसेनेसह महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असे दोन्ही गट आपण पहिल्या स्थानावर असल्याचा दावा करत आहेत. शिवसेना हा या निवडणुकांमध्ये ३,११३ जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून, महाविकास आघाडीही भाजपाच्या पुढे असल्याचे शिवसेनेनं म्हटलं आहे. मात्र, भाजपाची अवस्था गिरे तो भी टांग उपर असल्याची टिप्पणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी केली आहे. दुसरीकडे आपण पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा भाजपानं केला आहे. निकाला संदर्भातील आकडेवारी भाजपाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शिवसेनेनं दिलेल्या माहितीनुसार १२,७११ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं ३ हजार ११३ जागा जिंकल्या असून, सर्वाधिक जागा जिंकणारा पहिल्या क्रमाकाचा पक्ष ठरला आहे. भाजपानं २ हजार ६३२ जागा जिंकल्या असून, दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी २४०० जागांसह तिसऱ्या क्रमाकावर आहे. काँग्रेसनंही राज्यात १८२३ जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ३६ जागी विजय मिळविला आहे. तर २ हजार ३४४ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी झालेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या काँग्रेसच्या जागापेक्षा अधिक आहे.