मुंबई : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पुन्हा एकदा मागणीपेक्षा कमी करोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा केल्याचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्राला १७.५० लाख करोना प्रतिबंधक लसींची आवश्यकता आहे. आठ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन केलं आहे. आम्हाला करोना प्रतिबंधक लसीचे १० लाख डोस मिळाले. आम्हाला अजून साडेसात लाख लसींच्या डोसची आवश्यकता आहे” असे राजेश टोपे म्हणाले.
याआधी सुद्धा राजेश टोपे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी केंद्र सरकारने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा आरोप फेटाळून लावला होता. सर्व राज्यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या डेटाबेसनुसार त्यांना डोसची संख्या पाठवण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं होतं. मंत्रालयानं यासंदर्भात लोकसत्ता ऑनलाईनच्या बातमीची दखल घेऊन ट्विटरवरुन त्यावर प्रतिक्रिया देत आपली बाजू मांडली होती.