येस न्युज मराठी नेटवर्क : केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने नव्या कृषी कायद्यांच्या मुद्यावर सोमवारी झालेली चर्चेची सातवी फेरीही निष्फळ ठरली. कायदे रद्द न करता दुरुस्ती करण्याचा केंद्राचा प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी फेटाळल्यामुळे तिढा कायम राहिला. त्यामुळे आता ८ जानेवारी रोजी आणखी एकदा चर्चेसाठी बैठक होणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारचे नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास आता महिनाभरापेक्षाही जास्त काळ लोटला आहे. या आंदोलनात आतापर्यंत ६० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्यापही तोडगा निघालेला नसल्याने आंदोलन सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे.
“मोदी सरकारचे औदासीन्य आणि अहंकारामुळे ६० पेक्षा अधिक शेतकर्यांचा जीव घेतला आहे. त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी भारत सरकार त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करण्यात व्यस्त आहे. अशी क्रूरता, केवळ विशिष्ट भांडवलदारांच्या व्यावसायिक हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. कृषीविरोधी कायदे रद्द करा.” असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. तसेच, या ट्विटबरोबर मोदी सरकार हट्ट सोडा, हा हॅशटॅग देखील जोडण्यात आलेला आहे.